घर मे घुसके मारेंगे... अत्याचार प्रकरणातील आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
By संजय तिपाले | Published: June 12, 2023 04:42 PM2023-06-12T16:42:26+5:302023-06-12T16:46:33+5:30
आदिवासी मुलीचे लैंगिक शोषण: दोन्ही आरोपी पक्ष, संघटनेशी संंबंधित
गडचिरोली : दहावी उत्तीर्ण झालेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना १० जूनला एटापल्ली तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान, दोन्ही आरोपी हे पक्ष, संघटनेशी संबंधित असल्याची माहिती उजेडात आली असून यातील एका आरोपीचा घर मे घुसके मारेंगे... असा इशारा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एटापल्ली तालुक्यातील एक मुलगी वसितगृहात शिक्षण घेते. दहावी उत्तीर्ण झाल्याने पुढील शिक्षणासाठी टीसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) घेण्याकरता ती १० जून रोजी आली होती. शिक्षकांनी टीसीसाठी नंतर येण्यास सांगितल्याने ती परत जाण्यासाठी निघाली. यावेळी तिच्या ओळखीचा नेहाल शामसुंदर कुंभारे (२४,रा.जीवनगट्टा ता. एटापल्ली) हा दुचाकीवरुन जाताना दिसला. यावेळी पीडितेने त्यास कॉल केला असता तो तिला भेटण्यासाठी आला. पीडितेला चक्कर येऊ लागल्याने तिने काही वेळ सुरक्षित ठिकाणी घेऊन चल, असे सांगितले. त्यानंतर नेहालने तिला दुचाकीवरुन रोशन विठ्ठल गोडसेलवार (२२,रा.आलापल्ली) याच्या घरी नेले.
त्या दोघांसोबत तेथे अन्य एक होता. त्याला खाऊ आणण्यासाठी बाहेर पाठवले, त्यानंतर पीडितेला पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखे झाले. याचा फायदा घेत नेहाल व रोशन यांनी तिच्यावर अत्याचार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. सायंकाळी घरी परतल्यावर तिने घडला प्रकार कुटुंबीयास सांगितला. त्यानंतर नेहाल कुंभारे व रोशन गाेडसेलवार यांच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला.
टीसी काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन आरोपींना अटक
आलापल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो तपाकामी अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. पो.नि.किशोर महानुभव यांनी तातडीने सूत्रे फिरवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. यापैकी नेहाल कुंभारे हा शिवसेना युवा सेनेचा तर रोशन हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर रोशन गोडसेलवार याचा घर मे घुसके मारेंगे... शोक एैसे पाले है... कोई पुछे हमारे बारे मे तो कह देना बजरंग वाले है.. असे सांगणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ त्याने कधी बनवला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
शिवसेनेशी संबंध नाही
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकूर म्हणाले, संबंधित आरोपी बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याची माहिती घ्यावी लागेल, अहेरी माझ्या कार्यक्षेत्रात नाही, असे त्यांनी सांगितले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रियाज शेख म्हणाले, या आरोपीचा शिवसेनेशी संबंध नाही. त्याच्याकडे अधिकृत कुठले पद नाही व तो पक्षाचा अधिकृत सदस्यही नसल्याचा दावा त्यांनी केला.