गडचिरोलीत प्रशिक्षण केंद्र
By admin | Published: January 3, 2016 02:04 AM2016-01-03T02:04:05+5:302016-01-03T02:04:05+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शेतकरी बचतगटांना कृषी यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
कृषी यंत्रांची दुरूस्ती : शासनाकडे अहवाल केला सादर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शेतकरी बचतगटांना कृषी यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या यंत्रांच्या दुरूस्तीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे अवजारे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाची हिरवी झेंडी मिळाल्यास पुढील दीड महिन्यात सदर प्रशिक्षण केंद्र गडचिरोली येथे सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद व आदिवासी विकास विभागाच्या निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गटांना धान रोवणी यंत्र, कोनोविडर, नागर, पॉवर ट्रिलर, धान कापणी यंत्र आदींचे वितरण करण्यात आले आहे. सदर सर्व यंत्र गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन आहेत. त्यामुळे एखादेवेळी थोडाफार तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास कंपनीच्या व्यक्तीची वाट बघावी लागते. परिणामी कामाचा खोळंबा होत आहे. दोन वर्षानंतर कंपनीचा माणूसही दुरूस्तीसाठी येणार नाही. त्यामुळे यंत्र दुरूस्तीची समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचे वाटप केले आहे. या चारही जिल्ह्यांसाठी गडचिरोली हा मध्यवर्ती जिल्हा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीला मंजुरी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे उपसंचालक विजय कोळेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली आहे. (नगर प्रतिनिधी)