गडचिरोलीत दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घेतली १.७५ लाखांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:58 PM2020-05-29T19:58:18+5:302020-05-29T19:58:37+5:30
गडचिरोलीत तक्रारीच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी संबंधिताकडून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तक्रारीच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी संबंधिताकडून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाकर रामभाऊ कोरेवार (४८) आणि प्रेरणा पुनमसिंह उईके (३४) अशी आरोपींची नावे आहेत.
वन विभागाच्या फिरत्या पथकाचे (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) वन परिक्षेत्र अधिकारी दिवाकर कोरेवार यांनी तक्रारकर्त्याला सर्व्हे नंबर १ ते ११ यामधील मालाच्या चौकशीत शिथिलता देण्याकरिता दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यात लाचेची रक्कम कोरची तालुक्यातील बेडगावच्या वन परिक्षेत्राधिकारी प्रेरणा उईके यांच्यामार्फत स्विकारण्यात आली. सदर दोन्ही अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, निरिक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नत्थु धोटे, नायक सतीश पत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबळे, शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर, चालक घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.