गडचिरोलीत हिंसक घटनांनी निवडणुकीला गालबोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:05 AM2019-04-12T06:05:30+5:302019-04-12T06:05:58+5:30
७० टक्के मतदान : तीन पोलीस जखमी; अनेक ठिकाणी मतदान केंद्रे बदलली
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भागात हिंसक घटनांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले. यात तीन पोलीस जवान जखमी झाले. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७० टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे.
एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी गावच्या शाळेजवळ नक्षलवाद्यांनी सकाळी ११ च्या सुमारास भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. गेल्या निवडणुकीपर्यंत त्या शाळेत मतदान केंद्र होते. परंतु घातपाती कारवायांची शक्यता पाहून या वेळी मतदान केंद्र अंगणवाडी केंद्रात ठेवल्याने त्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटानंतरही गावात मतदान सुरळीत सुरू होते.
दुसऱ्या घटनेत कोरसलगोंदी या मतदार केंद्रावरील कर्मचारी आणि पोलीस मतदान प्रक्रिया पूर्ण करून ३.१५ वाजता हेडरी येथील बेस कॅम्पवर येण्यासाठी पायी निघाले असता गावाजवळच भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्यात एक जवान जखमी झाला.
मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी एटापल्ली तालुक्यातच गट्टा (जांभिया) येथे मतदान केंद्राकडे जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बससमोरील पोलीस कर्मचाºयांना लक्ष्य करून भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
गडचिरोलीतील सर्व केंद्रांवर दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असल्यामुळे सकाळी ७ वाजतापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी करणे सुरू केले होते. शहरातील काही केंद्रांवर मतदानाची वेळ संपली तरी गर्दी कमी झालेली नव्हती.
एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे नक्षल दहशतीला न जुमानता दुपारच्या भर उन्हात जंगलालगतच्या एका घरात ठेवलेल्या मतदान केंद्रावर नागरिकांची अशी रांग लागली होती
मतदारांचा ट्रॅक्टर उलटला; तीन महिला ठार
डोंगरमेंढा गावातील नागरिक मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरने जात असताना ट्रॉली उलटल्याने तीन महिला मतदार ठार झाल्या. याशिवाय ४ जण गंभीर तर १७ किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी १.३० वाजता घडली. यमुना मुरारी मलगाम (६०), हिराबाई मनिराम राऊत (७०), रसिका ईश्वर मरसकोल्हे (६०) अशी मृतांची नावे आहेत.