गडचिरोली शहरात होणार सव्वा कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:55 PM2018-04-09T22:55:01+5:302018-04-09T22:55:01+5:30
गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख ५३ हजार ९२९ रूपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा काढली असून सदर कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख ५३ हजार ९२९ रूपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा काढली असून सदर कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी दिली आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये धानोरा मार्ग ते साई ग्राफिक्सपर्यंत रस्त्याचे खडीकरण करणे व नाली बांधकाम करणे, यासाठी ९ लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. आरमोरी मार्ग ते अप्पलवार दवाखान्याकडून राधिका रेस्टॉरेंटपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी ८ लाख ५२ हजार ४०० रूपयांचा निधी मंजूर आहे. अविनाश खेवले ते मेश्राम ते अहिरकर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी ७ लाख ६६ हजार रूपये मंजूर आहेत. फाले यांच्या घरापासून सज्जनपवार यांच्या घरामागील नालीचे बांधकाम केले जाणार आहेत. त्यासाठी ४ लाख ५ हजार ६०० रूपयांचा निधी मंजूर आहे.
बोरमाळा नदीघाट रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ५८ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर आहे. पटेल सायकल स्टोअर्स ते बाबनवाडे यांच्या बिल्डिंगपर्यंत नाली बांधकाम व स्लॅब ड्रेनचे काम केले जाणार आहे. त्यासाठी १३ लाख ७ हजार रूपये मंजूर आहेत. कारमेल हायस्कूलच्या मागे वासेकर ते बायपास, अप्पलवार ते चांबुलवार ते साखरे यांच्या घरापर्यंत काँक्रिट नालीचे बांधकाम केले जाणार आहे. या कामासाठी १४ लाख ७५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व कामे १ कोटी १५ लाख ५३ हजार रूपयांची आहेत. सदर कामांची निविदा निघाली असल्याने ही कामे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
लवकरच होणार कामांना सुरुवात
प्रशासकीय मान्यतेनंतर दलितेत्तर वस्ती सुधार योजनेच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रस्ता, नालीचे बांधकाम केले जाणार असल्याने संबंधित वॉर्डांमधील रस्त्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
दलित वस्तीत ५४ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात गडचिरोली नगर परिषदेला २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी यापूर्वीच खर्च झाला. ५४ लाख ९ हजार रूपयांचा निधी शिल्लक होता. सदर निधीतून विकास कामे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून हजारे आटा चक्की ते रामटेके यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे, गंदेवार ते चामोर्शी मार्गापर्यंत सिमेंट काँक्रिटचे रोड करणे, साईनाथ साळवे ते गाळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता, खडीकरण व मुरूम टाकण्याचे काम केले जाणार आहे. दुर्गे ते कोठारे ते हजारे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण केले जाणार आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये खुल्या जागेचे सौंदर्यीकरण होईल. एमआयडीसी, बसेरा कॉलनीतील रस्त्यांचे खडीकरण, वॉर्ड क्र. २३ मधील अरविंद सोनुले ते विनोद वाढई यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट मार्ग, वॉर्ड क. १६ मध्ये अर्चना फुलझेले ते सुनील गोंगले यांच्या घरापर्यंत खडीकरण, नाली, वॉर्ड क्र. १५ मधील चंद्रपूर मार्ग ते भांडेकर यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण होणार आहे.