पोलिसांशी चकमकीत महिला नक्षलवादी ठार; एका बंदुकीसह नक्षल्यांचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 10:24 AM2022-10-01T10:24:20+5:302022-10-01T10:26:34+5:30

जंगलात सलग तिसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरूच

Gadchiroli | Woman Naxalite killed in encounter with police; naxal materials seized along with a gun | पोलिसांशी चकमकीत महिला नक्षलवादी ठार; एका बंदुकीसह नक्षल्यांचे साहित्य जप्त

पोलिसांशी चकमकीत महिला नक्षलवादी ठार; एका बंदुकीसह नक्षल्यांचे साहित्य जप्त

Next

गडचिरोली : अहेरी उपविभागांतर्गत येणा­ऱ्या राजाराम (खांदला) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापेवंचा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. सोबत ८ एमएम रायफल आणि नक्षल्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले. दरम्यान, सलग तिसऱ्या शुक्रवारी पोलिसांची जंगलात शोधमोहीम सुरूच असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे ३० ते ४० नक्षलवादी घातपात करण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि.२८) एकत्र जमलेले असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांच्या सी-६० पथकाने कापेवंचा जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. त्याच दिवशी सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्रास्र लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी पोलीस जवानांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले, पण त्यांनी गोळीबार सुरूच ठेवल्याने जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर एका नक्षल महिलेचा मृतदेह आढळला. सोबत एक ८ एमएम रायफल, नक्षल्यांचे साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तो मृतदेह गडचिरोलीत आणला असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.

दोन वर्षांत ५५ जणांना कंठस्नान

ऑक्टोबर २०२०पासून ते सप्टेंबर २०२०पर्यंत ५५ नक्षलवाद्यांचा गडचिरोली पोलीस दलाच्या गोळीचे वेध घेतला. ४६ नक्षलवाद्यांना अटक केली, तर १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. हे अभियान पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Web Title: Gadchiroli | Woman Naxalite killed in encounter with police; naxal materials seized along with a gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.