लेखा व वित्त अधिकाऱ्याला विनयभंगप्रकरणी अटक; गडचिरोली जिल्हा परिषदेत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 03:24 PM2022-11-22T15:24:37+5:302022-11-22T15:25:37+5:30
पाच महिन्यांपूर्वी झाले हाेते रूजू
गडचिराेली : जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफाे) ओमकार अंबपकर (५४) यांना महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी साेमवारी सायंकाळी ७ वाजता गडचिराेली पाेलिसांनी अटक केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे.
ओमकार अंबपकर हे मूळचे काेल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथील रहिवासी आहेत. ते गडचिराेली जिल्हा परिषदेत पाच महिन्यांपूर्वी रूजू झाले. वरिष्ठ सहायकपदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला १६, १७ व १८ नाेव्हेंबर राेजी स्वत:च्या कॅबिनमध्ये बाेलावून तिचा विनयभंग केला. तशी तक्रार पीडित महिला कर्मचाऱ्याने गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये साेमवारी सायंकाळी ५ वाजता दाखल केली.
त्यावरून गडचिराेली पाेलिसांनी अंबपकर यांच्याविराेधात भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड) तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर शाेधमाेहीम राबवून अवघ्या दाेन तासातच सायंकाळी ७ वाजता आराेपीला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा तपास गडचिराेलीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रणील गिल्डा करीत आहेत.