पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले गडचिरोलीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:11 AM2018-09-03T01:11:13+5:302018-09-03T01:12:05+5:30
केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. रविवारपासून शहरात सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निधी संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी अनेक कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत फिरून मदतीसाठी निधी संकलीत केला.
केरळ पुरग्रस्त सहायता निधी समिती गडचिरोलीच्या वतीने रविवारी दुपारी १ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहातून निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. डॉ. देवराव होळी, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे घिसुलाल काबरा, प्रा. शेषराव येलेकर, देवानंद कामडी, न. पं. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डॉ. भारत खटी, प्रकाश अर्जुनवार, प्राचार्य राजेश चंदनपाट, रमेश भुरसे, वासुदेव बट्टे, नगरसेवक केशव निंबोड, स्मिता लडके, सुधा सेता, राजनहिरे, साळवे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इंदिरा गांधी चौक ते चंद्रपूर रोडवरील बाजारपेठ, गांधी वॉर्ड, सराफा लाईन, बाजार चौक ते कारगिल चौक, चामोर्शी मार्गावरील बाजारपेठ, आरमोरी मार्गावरील श्री मंगल कार्यालयापासून पेट्रोलपंपापर्यंत, गांधी चौक ते धानोरा मार्गावरील बसस्थानक ते लांझेडा आदी भागात फिरून कार्यकर्त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलित केला. यावेळी अनेक व्यावसायिक, नागरिकांनी केरळवासीयांसाठी निधी दिला. दुपारी १ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सदर निधी संकलन मोहीम सुरू होती. मदतपेटी घेऊन कार्यकर्ते फिरत होते.
दिवसभरात ६५ हजारांचा निधी जमा
केरळ पूरग्रस्त सहायता निधी समितीच्या वतीने गडचिरोली शहरात निधी संकलन मोहीम सुरू करण्यात आली असुन रविवारी दिवसभरात एकुण ६५ हजार रूपयांचा निधी जमा करण्यात आला. सोमवारी ही मोहिम जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयापासून कॉम्प्लेक्स परिसरात राबविण्यात येणार आहे. तसेच नगर पालिका व इतर शासकीय कार्यालय परिसरातून निधीचे संकलन करण्यात येणार आहे. चार दिवस संकलित झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. शहरातील सर्वच स्तरातील नागरिक पूरग्रस्ताच्या मदतीसाठी सरसावले आहेत.