गडचिरोलीची मिरची राज्याची सीमा ओलांडून थेट चीनमध्ये
By दिलीप दहेलकर | Published: March 30, 2023 11:34 AM2023-03-30T11:34:34+5:302023-03-30T11:35:49+5:30
तडका महाग : किलोमागे ५० रुपयांनी दरवाढ, उत्पादकांना होतोय फायदा
गडचिराेली : लाल मिरचीचे भाव यंदा तडकल्याने सामान्यांच्या जिभेला चांगलाच चटका लागला आहे. सर्वच वाणाच्या लाल मिरचीच्या भावात किलाेमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची निर्यात विदेशात हाेत असल्याने भाव वाढले आहेत.
उन्हाळा लागताच मार्च व एप्रिल महिन्यात गृहिणी वर्षभर पुरेल एवढ्या मिरचीची एकदाच खरेदी करून मसाला बनवितात. मात्र यंदा अवकाळी पावसाचे संकट मिरची उत्पादकावर आले. ऐन मिरचीचे पीक हाती येण्याच्या ताेंडावर अवकाळी पावसाने तडाखा दिला. मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने यंदा मिरचीच्या भावात वाढ झाली आहे. गडचिराेली येथे रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात मिरची व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली असता, सर्वच प्रकारच्या मिरचीचे दर यंदा वाढल्याचे त्यांनी सांगितले.
मिरचीचे उत्पादन महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, ओरिसा तसेच इतर प्रांतात हाेते. मात्र ऐन मिरची ताेडणीच्या काळात अवकाळी पाऊस बरसल्याने याचा परिणाम उत्पादनावर हाेऊन उत्पादन घटले. परिणामी बाजारपेठेत यंदा मिरचीचे भाव तडकले आहेत.
ही आहेत भाववाढीची कारणे
- अवकाळी पावसाचा मिरचीला जाेरदार तडाखा बसला. उत्पादन घटले.
- आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक भागात मिरचीचा तुटवडा.
- शेतकरी व व्यापारी माेठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात परदेशात करीत आहेत.
- मसाला कारखानदार व एक्सपाेर्टची मागणी वाढली.
चीनमध्ये चालली मिरची
चीन देशामध्ये तेथील सरकार सर्वसामान्यांना नाममात्र दरात सवलतीमध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मिरची उपलब्ध करून देत आहेत. यासाठी चीनमध्ये तीन ते चार प्रदेशांतून मिरची निर्यात हाेत आहे. विशेष करून महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची निर्यात चीन देशात हाेत आहे. याचाच परिणाम भाववाढीवर झाला आहे.
असे आहेत मिरचीचे दर
- मालेवाडा (गावठी मिरची) - २७० रुपये किलाे
- इंजेवारी (गावठी मिरची) - २७०
- झिंगी मिरची - २३०
- नंदिता मिरची - २२०
- तेजा मिरची - २४०
- शिकाऊ मिरची - २३०
अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील मिरचीची चीनमध्ये निर्यात हाेत आहे. त्यामुळे यंदा मिरचीच्या भावात किलाेमागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे.
- मयूर कावळे, मिरची व्यापारी
मिरची ही जीवनावश्यक वस्तू आहे. यंदा मिरचीचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर हाेत आहे. उत्पन्न गतवर्षी इतके आहे. मात्र महागाई वाढल्याने जमाखर्चाचा मेळ बसत नसल्याचे दिसत आहे.
- वर्षा बारसागडे, गृहिणी
आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात वर्षभराची मिरची एकदाच खरेदी करताे. यंदा मिरची खरेदी करावयाची आहे. बाजारात भाजीपाला खरेदी करताना सहज चाैकशी केली असता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे भाव वाढल्याचे समजले. भाव कमी हाेतात काय, यासाठी काही दिवस प्रतीक्षा करण्याचा विचार आहे. त्यानंतरच मिरचीची खरेदी करू.
- राेशनी मेश्राम, गृहिणी