राज्यस्तरावर गडचिरोलीची दखल
By admin | Published: January 4, 2017 01:17 AM2017-01-04T01:17:06+5:302017-01-04T01:17:06+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात देखील निवडणूक आॅनलाईन यंत्रणा उभारल्या बद्दल राज्य निवडणूक
निवडणूक कामकाज आॅनलाईन : निवडणूक आयोगाकडून प्रशंसा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात देखील निवडणूक आॅनलाईन यंत्रणा उभारल्या बद्दल राज्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगर पालिका, नगर पालिका निवडणूक पूर्व तयारी आढावा मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगवरून घेण्यात आला. यावेळी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी गडचिरोली प्रशासनाचे कौतुक केले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असावी, यासाठी अधिकाधिक काम संगणकाच्या मदतीने करण्याचा प्रयत्न आयोग करीत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली प्रशासनाच्या कामाची दखल घेण्यात आली. या कॉन्फरन्सींगला जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, नगर प्रशासन अधिकारी गजानन भोयर आदी उपस्थित होते.
घोषीत वेळापत्रकानुसार ५ जानेवारी २०१७ रोजी १ जानेवारी २०१७ अहर्ता दिनांक गृहित धरून तयार करण्यात आलेल्या मतदार यादीचा आराखडा प्रसिध्द करावयाचा आहे. त्यानंतर त्यावर हरकती आणि आक्षेप मागवून २१ जानेवारी २०१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पंचायत समिती निहाय निवडणूक अधिकारी हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे असावेत आणि अप्पर जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना निवडणूक निरिक्षक नेमावे, अशा सूचना निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी यावेळी दिल्या. (जिल्हा प्रतिनिधी)