गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला वेग

By admin | Published: June 17, 2016 01:22 AM2016-06-17T01:22:54+5:302016-06-17T01:22:54+5:30

गडचिरोलीचे नगराध्यक्ष पद सध्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार

Gadchiroli's post of President | गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला वेग

गडचिरोलीच्या नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला वेग

Next

इच्छुकांची संख्या वाढणार : भाजपमध्येही मोठी घडामोड होण्याची शक्यता
गडचिरोली : गडचिरोलीचे नगराध्यक्ष पद सध्या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी स्नेहमिलन कार्यक्रम व वाढदिवसाचे सोहळे साजरे होत आहे.
गडचिरोली नगर परिषदेवर सध्या अपक्ष आघाडीचे (युवाशक्ती) साम्राज्य आहे. मागील पाच वर्षांच्या काळात ठेकेदारीशिवाय नगरसेवकांनी कोणतेही विकास काम केलेले नाही. गडचिरोली शहराच्या विकासाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ केला आहे. राष्ट्रीय महामार्ग मंजूर असणाऱ्या भागात विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर झालेला खर्च महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर पाण्यात जाणार आहे. केवळ सरकारी निधीची उधळपट्टी या पदाधिकाऱ्यांनी करून शहर विकासाचा बोजवारा उडविलेला आहे. या सर्वपक्षीय नगरसेवक तेवढेच कारणीभूत आहेत. त्यामुळे या प्रचंड नाराजीच्या वातावरणात यावेळची नगरपालिका निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे, सुधाकर येनगंधलवार हे दोघे चर्चेत आहेत. मात्र या दोन्ही नावांना संघाचा विरोध असल्याचे समजते. संघाच्या वतीने एका बड्या व्यक्तीच्या नावाला पाठींबा दर्शविण्यात आला आहे. सध्या सदर व्यक्ती भाजपात नसली तरी पक्षाचे हित लक्षात घेऊन व नगरपालिकेत सत्ता बसविण्यासाठी यांनाच उमेदवारी द्या, असे साकडे संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी पक्षाच्या नागपूर येथील वरिष्ठ नेत्यांकडे घातले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून जिल्हा महासचिव नरेंद्र भरडकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय युवाशक्ती आघाडीच्या एका नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिल्या जाणार असल्याची चर्चा जोरात पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, अरूण हरडे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपने पिपरे व येनगंधलवार यांच्या व्यतिरिक्त उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस हरडे यांना उमेदवार करू शकते, असे राजकीय जाणकार मानतात. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते अतुल गण्यारपवार यांनीही गडचिरोली शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह संपूर्ण पॅनल मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या वतीने विद्यमान न.प. शिक्षण सभापती विजय गोरडवार, अ‍ॅड. संजय ठाकरे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. आपली आघाडी मैदानात नक्की उतरणार असल्याचे गण्यारपवार यांनी स्पष्ट केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरून चर्चा जोरात आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Gadchiroli's post of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.