चहा विक्रेत्याच्या मुलीची गगनभरारी
By admin | Published: June 18, 2014 12:12 AM2014-06-18T00:12:12+5:302014-06-18T00:12:12+5:30
शैक्षणिक गुणवत्तेत श्रीमंताची मुले येणे हे नवे व कठीण नाही. मात्र अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशाची गगनभरारी घेणे हे कौतुकास्पद आहे. येथील राणी
दिलीप दहेलकर - गडचिरोली
शैक्षणिक गुणवत्तेत श्रीमंताची मुले येणे हे नवे व कठीण नाही. मात्र अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यशाची गगनभरारी घेणे हे कौतुकास्पद आहे. येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालयात शिकणारी पूजा चंद्रगुप्त चुनारकर या चहा विक्रेत्याच्या मुलीने ९०.६० टक्के गुण घेऊन इयत्ता १० वीच्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. अभ्यासातील सातत्य व मनाची जिद्द या बळावर पूजाने यशाची गगनभरारी घेतली आहे.
पूजा चुनारकर ही आपल्या आई-वडील व लहान बहिणीसमवेत येथील फुले वार्डात स्वत:च्या छोट्याशा घरात वास्तव्याने आहे. पूजाची लहान बहीण ९ व्या वर्गात सेमी इंग्रजी माध्यमाला येथील विद्याभारती हायस्कूलमध्ये शिकत आहे. पूजाची आई गृहिणी असून वडील येथील आठवडी बाजार परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे एका दिवसाचे उत्पन्न १५० ते २०० रूपये आहे. पूजाचे कुटुंब केवळ चहाच्या दुकानावरच चालते. त्यांच्याकडे शेतीही नाही. पूजाचे वडील फक्त पाचवा वर्ग शिकलेले आहेत. तर आई अशिक्षित आहे. अशा अशिक्षित कुटुंबात राहून पूजाने अभ्यासातील सातत्य, जिद्द व चिकाटी याच्या बळावरच हे यश मिळविले आहे. मी रोज ६ तास अभ्यास करीत होते असे पूजाने सांगितले. घरासभोवताल टीव्हीचा गोंगाट असल्यामुळे पूजा आपल्या मैत्रिणीसोबत येथील शिवाजी सार्वजनिक वाचनालयात सकाळी व सायंकाळी रोज जाऊन अभ्यास करीत होती, असेही तिने लोकमतला सांगितले.
याबरोबरच शाळेच्या सुटीच्या दिवशी पूजाही आपल्या मैत्रिणीसमवेत कॉम्प्लेक्स परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील वाचनालयात जाऊन अभ्यास करीत होती. घरात कुणीही शिक्षित नसतांना आपण शिक्षणात प्रगती करून कुटुंबांचा आर्थिक आधार होण्याची मनिषा पूजाने बाळगली आहे.
हुशार व चांगल्या मैत्रिणींची सोबत मिळाल्यानेच शिक्षकवृंद्धाच्या मार्गदर्शनातून हे यश मिळविल्याचे पूजाने सांगितले. १० वीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या पूजा चुनारकर हिने इयत्ता १२ वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून घेऊन भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा लोकमतजवळ व्यक्त केली. पूजाच्या यशाबद्दल तिचे नातेवाईक, शेजारी, शिक्षकवृंद व मित्र परिवाराकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.