सुदृढतेसाठी खेळ आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:04 PM2019-01-31T23:04:30+5:302019-01-31T23:04:47+5:30
शाळेतील संस्कारच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वृद्धिंगत होते. त्यामुळे ज्ञानाची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सुदृढ आरोग्यासाठी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शाळेतील संस्कारच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वृद्धिंगत होते. त्यामुळे ज्ञानाची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सुदृढ आरोग्यासाठी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांनी केले.
येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डी. एम. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, संस्थेचे सहसचिव डी. एन. चापले, सदस्य अरूण मुनघाटे, नाना म्हशाखेत्री, प्राचार्य जी. एम. दिवटे, उपमुख्याध्यापक डी. टी. मामीडवार, पर्यवेक्षक पी. एन. उरकुडे व शालेय छात्र संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी जीवनात मोबाईलचा वापर धोकादायक असून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी केले. सोशल मीडियाच्या गैरवापरातून घडत असलेल्या विविध गुन्ह्यांबद्दल इत्यंभूत माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डी. एम. म्हशाखेत्री यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दर्जेदार कार्यक्रमांचे कौतुक करून स्वत:तील सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले.
स्नेहसंमेलनादरम्यान घेण्यात आलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्राचार्य जी. एम. दिवटे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन संजय निशाणे तर आभार उपमुख्याध्यापक डी. टी. मामीडवार यांनी मानले.