खेळ सांघिक भावनेचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:46 PM2018-12-27T22:46:18+5:302018-12-27T22:46:48+5:30
खेळ आणि आदिवासींचे अतूट नाते आहे. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदिवासी खेळाडूंची नावे चमकत आहेत. आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. पण शिक्षणासोबत आरोग्याकडे आणि खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठीच या स्पर्धा घेतल्या जातात. खेळामध्ये स्पर्धा आलीच.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खेळ आणि आदिवासींचे अतूट नाते आहे. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदिवासी खेळाडूंची नावे चमकत आहेत. आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. पण शिक्षणासोबत आरोग्याकडे आणि खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठीच या स्पर्धा घेतल्या जातात. खेळामध्ये स्पर्धा आलीच. पण या स्पर्धांमध्ये हेवेदावे असणार नाही, ही आदिवासी समाजाची विशेषता. आदिवासी समाजाचे आरोग्य आणि एकी टिकून राहण्यासाठी या स्पर्धा सहायक सिद्ध होतील. खेळ आदिवासींच्या सांघिक भावनेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन डॉ. अभय बंग यांनी केले.
आदिवासी युवा खेळ, सांस्कृतिक उत्सव बिरसा मुंडा युवक-युवती मंडळ उदेगाव आणि सर्च संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. व्ही. के. चारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ युवक युवतींच्या व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धांचे आयोजन २६ ते २८ डिसेंबर दरम्यान उदेगाव येथे करण्यात आले आहे. स्पर्धेेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व माजी आमदार हिरामण वरखडे होते. यावेळी डॉ. योगेश कालकोंडे, गावपुजारी भजन दर्रो, चत्रू मडावी, महादेव हलामी, पोलीस पाटील नामदेव तुलामी, मागू गावडे, तुकाराम दर्रो, दिवाकर दर्रो, मारोती उसेंडी उपस्थित होते.
उदेगाव येथील स्पर्धेच्या आयोजनाबाबत डॉ. बंग म्हणाले, या गावाचा आणि शोधग्रामचा खूप जुना संबंध आहे. १९९३ मध्ये मॉ दंतेश्वरी रुग्णालयाची स्थापना होताना आपल्या रुग्णांसाठी पहिली झोपडी उदेगावच्या लोकांनी बांधली. त्यामुळे येथे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. सर्चच्या माध्यमातून आपण आदिवासी आरोग्यासाठी काम करीत आहोत. हे करीत असताना आदिवासी युवांमधील खेळाची भावना वाढून त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्ही या स्पर्धा आणि लोककला टिकून राहण्यासाठी युवा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला. या स्पर्धा कुणाला मागे टाकण्यासाठी नाही. या स्पर्धा आनंद साजरा करण्यासाठी आहेत. त्यामुळे या आनंदातून आपला विकास साधण्याचे आवाहन डॉ. बंग यांनी केले.
स्पर्धेमध्ये कबड्डी खेळासाठी मुलांचे ४१, मुलींचे १८ तर व्हॉलिबॉल खेळासाठी मुलांचे ३७ आणि मुलींचे १८ असे एकूण ११४ संघ २३ गावांमधून सहभागी झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. शाळेचे शिक्षक बरडे, चिल्लमवार यांनी यासाठी परिश्रम घेतले.
ग्रामस्थांनी पेसा कायद्यावर आधारित लघुनाटिका सादर केली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून आणि ध्वज फडकवून सामान्यांचे रितसर उद्घाटन झाले. सर्चमधील जीवन शिक्षण विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र इसासरे, नाजूक जाडे, महादेव साखरे यांच्या साथीला प्राथमिक आणि संपूर्ण गावकरी स्पर्धांसाठी सहकार्य करीत आहेत. सर्च च्या आदिवासी भागातील फिरत्या दवाखाण्याची संपूर्ण टीम डॉ. रितू दमाहेच्या नेतृत्वात स्पर्धेदरम्यान आरोग्यसेवा खेळाडू व नागरिकांना देत आहेत.
आदिवासी संस्कृतीची छाप
स्पर्धेेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी तयारी केली. गवत आणि बांबूचा वापर करून तीन प्रवेशद्वार आणि मंच साकारण्यात आले. मातींच्या नैसर्गिक रंगांनी स्पर्धेेचा संपूर्ण परिसर सजविण्यात आला. त्यामुळे या स्पर्धांवरच आदिवासी संस्कृतीची छाप दिसून आली. सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
खर्रा नावाचे जहर सोडा
आदिवासी समाजात, खास करून युवा वर्गात खर्रा खाण्याचे प्रमाण वाढत आहे. हे विष पोटात गेल्याने, तोंडाचा कर्करोग, हृदयविकार, लकवा असे आजार या समाजात बळावत आहेत. सुदृढ शरीरासाठी युवक करीत असलेले परिश्रम खर्रा खाल्ल्याने वाया जात आहेत. आर्थिक मिळकतीचा खूप मोठा वाटा या जहरावर आदिवासी समाज खर्च करीत आहे. त्यामुळे स्वत:चा शारीरिक, आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी खर्रा व इतरही व्यसन टाळा, असे कळकळीचे आवाहन डॉ. अभय बंग यांनी याप्रसंगी केले.