गांधीवाद्यांनी लढाऊ गांधी सांगितलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:04 PM2020-01-14T13:04:57+5:302020-01-14T13:05:25+5:30
गांधीवादी, सर्वोदयी लोकांनी लढाऊ गांधी सांगितलाच नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि लोकमत नागपूरचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही ते महात्मा गांधींना समजू शकत नाही. गांधी अहिंसावादी असले तरी लढाऊ होते. पण स्वत:ला अनुयायी म्हणणारे कधी आंदोलन करताना दिसले? असा प्रश्न करत गांधीवादी, सर्वोदयी लोकांनी लढाऊ गांधी सांगितलाच नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि लोकमत नागपूरचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.
कमल-गोविंद स्मृती प्रतिष्ठान आणि दंडकारण्य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व संशोधन संस्थेच्या वतीने रविवारी गडचिरोलीत आयोजित व्याख्यानात प्रा.द्वारशीवार बोलत होते. ‘गांधी समजून घेताना’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्यांनी गांधींचे विचार, तत्व आणि त्याबद्दल समाजात पसरविण्यात आलेले समज-गैरसमज स्पष्ट केले. मार्क्सवादी, हिंदूत्ववादी, समाजवादी आणि गांधीवाद्यांनी गांधींना समजून न घेता सोयीस्करपणे गैरसमज पसरविले. कारण गांधींच्या विचारांचा पगडा असेपर्यंत आपला स्वार्थ साधणे त्यांना शक्य वाटत नसल्याचे प्रा.द्वारशीवार यांनी परखडपणे सांगितले. ते म्हणाले, गांधीजींवर आजवर एक लाख पुस्तकं लिहिली गेली. जगात मोठमोठ्या लोकांनी गांधींचे महत्व समजून घेतले असताना गांधी म्हणजे काही गूढ आहे असे आजही अनेकांना वाटते. त्यांच्याबद्दल आजही गैरसमज पसरविले जातात.
मार्क्सवाद्यांनी शेतकरी आणि कामगारांचे राज्य आणतो म्हटले तरी शेतकरी-कामगार त्यांच्या मागे गेले नाहीत. जिथे उद्योगच नाही तिथे कामगारांचे शोषण कुठे आले? गांधी म्हणतात, ज्यांचे शोषण होते त्यांच्याच हाती सत्ता द्या. खेड्याकडे चला, खेडे सक्षम करा. पण त्यांच्या सांगण्याचा विपर्यास करून त्यांचे विचार विकासविरोधी, मागासलेपणाचा असल्याचे भासविले जात आहे.
हिंदूत्ववाद्यांनी देशाच्या फाळणीला गांधीच जबाबदार असल्याचा समज पसरविला, पण गांधी जन्माला येण्याच्या आधीच १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम फाळणीचा विचार केला होता. त्यानंतर वारंवार हा मुद्दा उफाळला हे सांगताना त्यांनी काही संदर्भही दिले. १९२० मध्ये गांधी देशाचे नेते झाले, पण मरेपर्यंत त्यांनी मुस्लिमांना काहीच वेगळे दिले नाही. उलट ‘माझ्या देहाचे दोन तुकडे करा, मगच देशाची फाळणी करा,’ असेच ते शेवटपर्यंत म्हणाले, हे समजून घ्यावे असे द्वादशीवार म्हणाले. गांधी आणि सावरकरांमध्ये मतभेद नव्हे तर प्रकृतीभेद होता. सावरकरांच्या सुटकेचा ठराव गांधींनीच पहिल्यांदा काँग्रेसमध्ये घेतला, हे सावरकरांवर प्रेम करणाऱ्यांनी समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गांधीजींनी पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणासाठी पुढाकार घेतला. डॉ.आंबेडकर आणि गांधी यांच्यात मतभेद असले तरी ‘मला समजून घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे गांधी’ असे आंबेडकरांनी म्हटले आहे, पण ही बाब कुठे सांगितली जात नसल्याचे ते म्हणाले.
शेवटी त्यांनी गांधीवाद्यांवरही प्रहार केला. गांधीवादी म्हणवून घेणारे लोक आपल्या कुट्या, आश्रम सांभाळत आणि आतून मजबूत करत बसले, पण या जिल्ह्यातल्या नक्षलवादाविरूद्ध बोलायला आले का? असा सवाल त्यांनी केला. गांधी गेले तरी चालेल पण सरकारी अनुदान जायला नको, अशी त्यांची भूमिका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले. या भरगच्च कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि इतरही क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.