पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

By दिलीप दहेलकर | Published: July 25, 2023 08:53 PM2023-07-25T20:53:23+5:302023-07-25T20:54:08+5:30

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

Ganesh death due to priest's village treatment; No treatment at the hospital, gadchiroli | पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

पुजाऱ्याच्या गावठी उपचारामुळेच गणेशचा मृत्यू; रूग्णालयात उपचारच घेतला नाही!

googlenewsNext

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील कृष्णार येथील गणेश लालसू तेलामी या २३ वर्षीय अविवाहित युवकाचा क्षयरोगाने मृत्यू होऊन त्याला रूग्णवाहिका न मिळाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. दुसऱ्या दिवशी जिल्हा व तालुकास्तरावरील चमूने थेट कृष्णार गाव गाठून सदर मृत्यू प्रकरणाबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेतली असता विदारक वास्तव उजेडात आले. 

गणेश तेलामी याने तब्बल तीन महिने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागात अजुनही आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा व अज्ञान आहे. तालुकास्तर व मोठ्या गावापर्यंत शासकीय आरोग्य सेवा पोहोचली असली तरी या भागातील अनेक लोक अज्ञानामुळे रूग्णालयात जाऊन औषधोपचार करीत नाही. असाच प्रकार गणेश तेलामी याच्याबाबत घडला. 

तीन महिन्याआधीपासून गणेशची प्रकृती बिघडली. दरम्यान, तो स्वत: किंवा कुटुंबियांनी शासकीय व कोणत्याही खासगी रूग्णालयात जाऊन औषधोपचार घेतला नाही. गावठी उपचारावर पूर्णत: निर्भर राहिला. अहेरी- भामरागड दरम्यान असलेल्या बांडियानगर येथे पुजाऱ्याकडे जाऊन तब्बल तीन महिने गणेशने गावठी उपचार घेतला. परिणामी प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. पोटदुखी, अतिसार, ताप आदी त्रास होऊ लागला. प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर त्याला कुटुंबियांनी हेमलकसाच्या लोकबिरादरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. येथे गणेशला १७ जुलैला भरती करण्यात आले. १९ जुलैला तो क्षयरोग पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. उपचारादरम्यान त्याचा २० जुलैला मृत्यू झाला.

पोलिसांच्या मदतीने दिली शववाहिका
गंभीर रूग्णांना ने-आण करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयामार्फत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. मात्र मृतदेहाला नेण्यासाठी रूग्णवाहिका दिली जात नाही. त्यासाठी शववाहिका देण्याची तरतूद आहे. लोकबिरादरी दवाखान्यातून दुचाकीवर खाट बांधून त्यावर मृतदेह आणताना तेलामी कुटुंबिय पोलिसांना दिसले. दवाखान्यापासून एक किमी अंतरावर आल्यावर भामरागड पोलिसांनी त्यांना अडविले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांना माहिती देताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे संपर्क साधून शववाहिका बोलाविली व त्यातून मृतदेह पाठवला, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या कारणामुळे झाला मृत्यू
गणेशला ताप होता. वजन व रक्त फार कमी होते. रक्त केवळ ७.८ ग्रॅम होते. त्याला रक्ताची गरज होती. त्याला पोटदुखी, अतिसाराचा त्रास होता. मात्र पुजाऱ्याकडे उपचार करण्यात वेळ दवळल्याने त्याला प्राणाला मुकावे लागले. याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. कधी आंध्रप्रदेश, कधी पेरमिली आदी ठिकाणी राहून तो काम करायचा. त्यामुळे तो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला नाही.

गणेशने पुजाऱ्यांकडून गावठी उपचार घेतला. प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात दाखल केले, अशी माहिती मृतक गणेशचा लहान भाऊ दिलीप लालसू तेलामी यांच्याकडून मिळाली. गणेशची प्रकृती बिघडल्याबाबतची थोडीशीही माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना नव्हती. आज घरी भेट देऊन चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.
- डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, भामरागड
 

Web Title: Ganesh death due to priest's village treatment; No treatment at the hospital, gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.