सत्यवानरावांच्या निधनानंतर सुरू झाला गणेशोत्सव
By admin | Published: September 12, 2016 02:10 AM2016-09-12T02:10:36+5:302016-09-12T02:10:36+5:30
माजी आमदार व अहेरीचे दिवंगत राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी राणी रूख्मिणीदेवी यांनी राजमहल परिसरात
राजपरिवारातील सोहळा : पंचक्रोशीतील आकर्षण
अहेरी : माजी आमदार व अहेरीचे दिवंगत राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी राणी रूख्मिणीदेवी यांनी राजमहल परिसरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून येथे श्रीगणेश उत्सवाला सुरूवात झाली. यंदा या गणेशोत्सवाचे पाचवे वर्ष आहे.
गणपती विराजमान झाल्यानंतर संपूर्ण राजपरिवाराचे सदस्य सर्व धार्मिक कार्यक्रमांवर लक्ष देऊन राहतात. दररोज सकाळ व संध्याकाळची आरती स्वत: राणी रूख्मिणीदेवी व अवधेशराव यांच्या उपस्थितीत केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. या संपूर्ण कार्यक्रमाला राणी रूख्मिणीदेवी स्वत: जातीने हजर राहून परिसरातील गावांमधून देखावे, गणेशमूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची व्यक्तिगत विचारपूस करतात. अनेक लोक मंडपातच मुक्कामीही राहतात. त्यांचीही सकाळी विचारपूस केल्याशिवाय राणी रूख्मिणीदेवी यांची दिनचर्या सुरू होत नाही. गणेशोत्सवाचे १० दिवस संपूर्ण राज परिवार अहेरीत राहून पार पाडतात. सकाळ व संध्याकाळी दररोज लाडूचा प्रसाद उपस्थितांना वितरित केला जातो. या कामावरही अवधेशराव स्वत: लक्ष ठेवून असतात. धार्मिक उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. हा श्रीगणेश विराजमान झाल्यानंतर राणी रूख्मिणीदेवी यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळाले. त्यानंतर राजे अम्ब्रीशराव आत्राम विधानसभेवर निवडून गेलेत. पहिल्यांदाच त्यांना राज्यमंत्री पदही मिळाले, असे अनेकजण सांगतात. ना. अम्ब्रीशराव आत्राम कामात व्यस्त असले तरी राणी रूख्मिणीदेवी हा उत्सव सांभाळून घेतात.
राजमहालातील गणेशाच्या मूर्तीची निवड, वेशभूषा, आकार व रूप कसे असले पाहिजे, याची निवड राजे अम्ब्रीशराव महाराज व अवधेशराव यांनी केली होती. फुलांचा हार, गणेश सजावट व मंदिर सजावटीकडे अवधेशराव स्वत: लक्ष देतात. (तालुका प्रतिनिधी)