जुगार खेळण्यासाठी तेलंगणातून दाखल हाेतात शाैकिनांचे जथ्थे; पातागुड्डम रस्त्यावर रंगताे खुलेआम डाव
By दिगांबर जवादे | Published: August 10, 2023 08:04 PM2023-08-10T20:04:41+5:302023-08-10T20:04:50+5:30
सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील गोलागुड्म परिसरातील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम पत्त्यांचा डाव रंगत आहे.
गडचिराेली : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील गोलागुड्म परिसरातील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम पत्त्यांचा डाव रंगत आहे. पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यातून जवळपास २०० जुगारी ७० ते ८० वाहने घेऊन आसरअल्ली परिसरात दाखल होत आहेत. या जुगाराच्या अड्ड्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सिरोंचा तालुक्यातील गोलागुडम हे गाव अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडते. गोलागुडम गावाच्या हद्दीतील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून अवैध जुगाराचा अड्डा सर्रासपणे सुरू आहे. सदर गाव तेलंगणा राज्यापासून जवळ असल्याने येथील जुगारी रोज तेलंगाणातून येतात. आसरअल्ली परिसर ग्रामीण असल्यामुळे या परिसरात शेती व्यावसायिक व मोलमजुरांची संख्या मोठी आहे. त्यांना जुगाराचा छंद जडल्यास संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा तसेच कर्जबाजारी होण्याचा धोका आहे. तसेच येथील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे. पोलिस विभागाने तत्काळ जुगार अड्डा बंद करून जुगाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांनी केला निषेध
आसरअल्ली पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या गोलागुडम गावाच्या हद्दीतील पातागुडम मार्गावर अवैधरीत्या लाखोंचा जुगार खेळला जात आहे. या जुगार अड्ड्यावर तेलंगणातून नागरिक मोठ्या प्रमाणात वाहन घेऊन भरधाव वेगाने येतात. या वाहनांच्या वेगामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या जुगार अड्ड्याच्या विरोधात नागरिकांनी हातांत फलक घेऊन रस्त्यावर उतरून निषेध केला.
बॉक्ससाठी...
पाेलिस लक्ष देतील काय?
जुगार अड्ड्यावर कारवाई करून अवैध धंदे बंद करा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आसरअल्ली पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदनातून केली आहे. निवेदन देताना माजी सभापती मोडेम सत्यम, टेकडामोटलाचे सरपंच हनुमंत समय्या कोय्याला, श्रीनिवास बापू मेडीर्जेज, समय्या बनय्या मोर्ला, राजू गणपत जैनवार, माजी उपसरपंच मोहनराव बनाया जाडी उपस्थित होते.