लूटमार करणाऱ्यांच्या टोळ्या आहेत सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:54+5:30
जवळपास सात ते आठ युवक लूटमार करीत असल्याची माहिती आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला आपण नक्षलवादी असल्याचे सांगतात. कापडाने तोंड पूर्णपणे झाकला राहत असल्याने त्याला ओळखणे कठीण होते. अनेक कर्मचारी तालुकास्थळावरून ग्रामीण भागात नोकरी करतात. त्यांना दरदिवशीच ये-जा करावे लागते. त्यामुळे पैसे न देण्याची हिंमत सदर कर्मचारी करीत नाही. नेमक्या याच स्थितीचा गैरफायदा या युवकांनी उचलला आहे.
लिकेश अंबादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांची लूटमार करणाऱ्या युवकांच्या टोळ्या नाडेकल परिसरातील गावांमध्ये आहेत. सध्या या टोळ्यांनी अजूनपर्यंत कोणाचाही जीव घेतला नसला तरी भविष्यात त्यांच्याकडून हिंसक कृत्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुरखेडा, कोरची हे दोन्ही तालुके जंगलाने व्यापले आहेत. दोन्ही बाजुला उंचचउंच झाडे आहेत. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला सहज लपून राहता येते किंवा पळूनही जाता येते. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांसह गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर फारशी वर्दळ राहत नाही. त्यातच या परिसरात नक्षलवाद्यांची अगोदरच दहशत आहे. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा उचलण्यासाठी नाडेकल फाटा परिसरातील काही बेरोजगार युवकांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. जवळपास सात ते आठ युवक लूटमार करीत असल्याची माहिती आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला आपण नक्षलवादी असल्याचे सांगतात. कापडाने तोंड पूर्णपणे झाकला राहत असल्याने त्याला ओळखणे कठीण होते. अनेक कर्मचारी तालुकास्थळावरून ग्रामीण भागात नोकरी करतात. त्यांना दरदिवशीच ये-जा करावे लागते. त्यामुळे पैसे न देण्याची हिंमत सदर कर्मचारी करीत नाही. नेमक्या याच स्थितीचा गैरफायदा या युवकांनी उचलला आहे. प्रवाशांकडून लुटलेला पैसा, जुगार, दारू, मटणाच्या पार्ट्या, चैनीच्या वस्तू खरेदीवर खर्च करीत आहेत, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
२००९ मध्ये याच परिसरातील युवकांची दुचाकी चोरणारी टोळी कार्यरत होती. त्यांनी काही दुचाकी चोरल्या होत्या. मात्र पोलिसांनी आरोपींना शोधून काढत दुचाकी संबंधित मालकांना परत केल्या. २०११ मध्ये नक्षलवाद्यांच्या नावाखाली कोरची शहरातील काही व्यापाºयांना धमकावून त्यांच्याकडून पैसे मागितले होते. धानाची चोरी सुध्दा केली होती. लुटमारीच्या घटना सातत्याने घडत राहतात. मात्र नागरिक याबाबत तक्रार करीत नाही. त्यामुळे त्या उघडकीस येत नाही.
शौक पूर्ण करण्यासाठी त्या तीन युवकांनी सुरू केली लूटमार
नाडेकल फाट्यावर लूटमार करणाºया कोटरा येथील वसनलाल मडावी, सोनापूर येथील प्यारेलाल हलामी, श्रीराम मडावी या तिघांना कोरची पोलिसांनी अटक केली. लोकमतने या तिघांचीही पूर्व पार्श्वभूमीवर जाणून घेतली असता, तिघेही कामचुकार असल्याची माहिती मिळाली. स्वत:च्या शौका पूर्ण करण्यासाठी या तिघांनी लूटमार करणे सुरू केले. प्यारेलालचे आई-वडील चिंतेत आहेत. माझा मुलगा लुटमार करायला कधी शिकला, हे मलाही माहित पडले नाही, अशी खंत व्यक्त केली. श्रीराम मडावी याने अजूनपर्यंत लग्न केले नाही. लुटमारीच्या पैशातून दारू व मटणाच्या पार्ट्या करणे हा त्याचा छंद झाला आहे. वसंनलाल हलामी याला पत्नी व तीन मुले आहेत. मोल मजुरी करून पत्नी मुलांचा उदरनिर्वाह करते. अशी माहिती मिळाली.