राज्यातील प्राध्यापक घेणार गडचिरोलीत सामाजिक प्रकल्पांचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 03:14 PM2022-10-11T15:14:47+5:302022-10-11T15:16:10+5:30
गोंडवाना विद्यापीठ आणि अध्यापक विकास संस्थेत सामंजस्य करार
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि गोंडवाना विद्यापीठगडचिरोली यांच्यात आदिवासी भागातील सामाजिक संस्थांच्या कार्याचा अनुभव देणाऱ्या कार्यशाळा आयोजित करण्याबाबत पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यात एकूण २३ सामंजस्य करार करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार, एका वर्षाला सहा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात २० प्राध्यापक आणि प्राचार्यांची एक बॅच राहणार असून, सात दिवसांची एक कार्यशाळा राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापकांना 'आदिवासी गौरव प्रवास-अनुभवातून नेतृत्व' या विषयावर या कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाईल.
सामंजस्य करार करताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विनायक निपुण, संबंधित शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काय असेल या कार्यशाळेत?
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात प्राध्यापक मोठ्या सामाजिक प्रकल्पांचा अनुभव घेतील आणि त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेतील. या जिल्ह्यात आरोग्य सेवा, शिक्षण, जंगल व्यवस्थापन, आदी विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्या संस्थांनी केलेल्या कामाचा परिणाम थेट लाभार्थ्यांवर दिसून येतो. त्यामुळे राज्यभर पसरलेल्या विद्यापीठांच्या प्राध्यापकांना त्यातून बरेच काही शिकण्याच्या संधी मिळणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी प्राध्यापक, प्राचार्य आपल्या भागामध्ये जाऊन स्वयंसेवी संस्थांनी केलेले कार्य आपल्या भागात राबवितील, असे एकंदरीत या कार्यशाळेचे स्वरूप राहील.