आॅनलाईन व्यवहारानंतरही गॅस ग्राहकांची लूट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:05 AM2019-03-29T00:05:03+5:302019-03-29T00:05:44+5:30
गॅस वितरणाच्या व्यवहारांमध्ये गतिमानता व पारदर्शकता आणण्याासठी गॅस कंपन्या सिलिंडर रिफिलिंगची प्रक्रिया आॅनलाईन करीत आहेत. यासाठी एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अॅप तयार केले आहे. गॅस रिफिलिंगचे पैसे संबधित ग्राहकांच्या खात्यामधून कपात होतात. यामध्ये गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचवून देण्याचा खर्च समाविष्ट राहतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गॅस वितरणाच्या व्यवहारांमध्ये गतिमानता व पारदर्शकता आणण्याासठी गॅस कंपन्या सिलिंडर रिफिलिंगची प्रक्रिया आॅनलाईन करीत आहेत. यासाठी एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अॅप तयार केले आहे. गॅस रिफिलिंगचे पैसे संबधित ग्राहकांच्या खात्यामधून कपात होतात. यामध्ये गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचवून देण्याचा खर्च समाविष्ट राहतो. तरीही गॅस सिलिंडर आणणारे मजूर ग्राहकांकडून ३० ते ४० रुपये उकळत आहेत.
गॅस सिलिंडर रिफिलिंगची आॅनलाईन प्रक्रिया होण्यापूर्वी ग्राहकाला सिलिंडरचे पैसे सिलिंडर आणणाऱ्या मजुराला द्यावे लागत होते. दरदिवशी गॅस सिलिंडरचे दर बदलत राहतात. याचा गैरफायदा मजुरांकडून घेऊन अधिकचे पैसे उकळले जात होते.
यावर उपाय म्हणून एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अॅप तयार केला आहे. या अॅपमध्ये गॅस रिफिलिंगची नोंदणी करण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध आहे. या अॅपसोबत बँक खातेही लिंक असल्याने गॅस रिफिलिंगसाठी नोंदणी झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या खात्यातून तेवढे पैसे कपात होतात. यामध्ये ग्राहकाच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवून देण्याचा खर्च समाविष्ट आहे. त्यामुळे सिलिंडर घरी घेऊन येणाऱ्या मजुराला एकही रुपया देण्याची गरज नाही. मात्र काही मजूर नागरिकांकडून १० ते २० रुपये मागतात. यापूर्वी मागितलेले पैसे व चिल्लर नसल्याचे सांगून उर्वरित पैसे परत न केल्याने प्रत्येक सिलिंडरमागे संबंधित मजूर ४० ते ५० रुपये कमवत होते. आता मात्र चिल्लर नसल्याचे कारणच राहले नाही. त्यामुळे मजुरांच्या वरकमाईला मर्यादा यायला लागल्या आहेत. त्यामुळे मजूर ग्राहकांकडून थेट ४० ते ५० रुपये मागत आहेत. बºयाच वेळा ग्राहकाचे घर दूर असल्याचे कारण सांगितले जाते.
सिलिंडर परत नेण्याची धमकी
ज्यावेळी गॅस सिलिंडर घरी आणला जातो, त्यावेळी घरातील मुख्य व्यक्ती अनेक वेळा बाहेर राहतात. महिलांकडे बहुदा अधिकचे पैसे राहात नाही. अशावेळी पैसे न दिल्यास गॅस सिलिंडर परत नेण्याचीही धमकी मजूर देतात. या सर्व प्रकारांमध्ये गॅस एजन्सीच्या मालकाचा दोष नसला तरी गडचिरोली शहरातील सर्वात मोठी गॅस एजन्सी म्हणून ओळख निर्माण केलेल्या एजन्सीची बदनामी होत आहे. या प्रकाराकडे एजन्सीच्या संचालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पैसे मागण्याचे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.