घोटसुरात गॅस्ट्रोचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:29 AM2018-09-01T00:29:26+5:302018-09-01T00:30:46+5:30
तालुक्यातील कसनसूरपासून सात किमी अंतर असलेल्या घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून मागील १५ दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही २९ आॅगस्ट रोजी एका नागरिकाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील कसनसूरपासून सात किमी अंतर असलेल्या घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून मागील १५ दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही २९ आॅगस्ट रोजी एका नागरिकाचा मृत्यू झाला. यावरून घोटसूर येथे गॅस्ट्रोची साथ अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
राजेश ऋषी हेडो (२४) यांचा १६ आॅगस्ट रोजी गावातच मृत्यू झाला. लक्ष्मण कोडू मडावी (६२) यांचा २२ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान अहेरीवरून गडचिरोली येथे नेताना मृत्यू झाला. तर मिटको चन्नू हेडो (६२) या महिलेचा गावातच मृत्यू झाला. रवी दिलीप नरोटे (२२), विठ्ठल माडू लोनबले यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. गॅस्ट्रोची लागण होऊन एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खळबळून जागे झाले आहे.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यासह आरोग्य विभागाची चमू गावात पोहोचली. गावातील विहिरींच्या पाण्याचे नमुने घेतले असता, बहुतांश विहिरींच्या पाण्याचे नमुने दुषित आढळले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे २०० क्विंटल ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले. तरीही गॅस्ट्रोची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली नाही. अजुनही गॅस्ट्रोचा त्रास काही नागरिकांना सुरू असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण अजुनही कायम आहे. घोटसूर हे गाव कसनसूरपासून सात किमी अंतरावर आहे. या गावाला जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. तीन किमी अंतरावर नाला असून या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे नाल्याच्या पाण्यातून वाहने जात नाही. परिणामी या गावात जाणाऱ्या प्रत्येक नागरिक व अधिकाऱ्याला पायीच जावे लागते. मागील १५ दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावाजवळचा नाला ओसंडून वाहत आहे. अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली. विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले. पाण्याचा वापर करताना कशी काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
१८५ घरांच्या गावात सुमारे ९० विहिरी, १३ हातपंप
घोटसूर या गावात केवळ १८५ घरे आहेत. या गावात सुमारे ७५ कुटुंबांकडे लहान खासगी विहिरी आहेत. तर सरकारी १० विहिरी आहेत. अशा एकूण जवळपास ९० विहिरी आहेत. १३ हातपंप आहेत. यातील बहुतांश विहिरींना कठडे नाहीत. त्यामुळे दारात जमा झालेले पावसाचे पाणी सरळ विहिरीमध्ये जमा होते. तसेच विहिरीजवळ गायींचा गोठा आहे. या गोठ्यातील मलमूत्र सुध्दा पावसाच्या पाण्याबरोबर विहिरीत जाते. पुढे हेच पाणी संबंधित कुटुंबातील नागरिक प्राशन करतात. पाणी शुध्द करण्याबाबत फारशी काळजी घेतली जात नाही. गॅस्ट्रोची लागण झाल्याचे माहित झाल्यानंतर आरोग्य विभागातर्फे या गावातील विहिरी व हातपंप यांच्यामध्ये सुमारे दोन क्विंटल ब्लिचिंग पावडर टाकण्यात आला.
गॅस्ट्रोमुळेच तिघांचाही मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही. मृत्यूची अनेक कारणे असू शकतात. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे. एखादा व्यक्तीला गॅस्ट्रोची लक्षणे दिसून आल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार केले जात आहेत. पाणी शुध्द करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- अभिजित गादेवार,
तालुका आरोग्य अधिकारी,
एटापल्ली