खुजेपणावर मात करीत गौरीची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:52 PM2018-06-08T23:52:42+5:302018-06-08T23:52:42+5:30
गडचिरोली येथील विद्याभारती कन्या विद्यालयात शिकत असलेली गौरी रत्नाकर निरकुलवार या दिव्यांग मुलीने खुजेपणावर मात करीत दहावीच्या परीक्षेत ८३.८० टक्के गुण मिळविले आहेत.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील विद्याभारती कन्या विद्यालयात शिकत असलेली गौरी रत्नाकर निरकुलवार या दिव्यांग मुलीने खुजेपणावर मात करीत दहावीच्या परीक्षेत ८३.८० टक्के गुण मिळविले आहेत. ती विद्या भारती कन्या विद्यालयातून द्वितीय आली आहे. गौरीचा दिव्यांगपणा डारपिजम या प्रकारातील आहे. तिची उंची केवळ दोन ते अडीच फुटादरम्यान आहे. चालण्यास व लिहिण्यास त्रास होत असला तरी ती नियमित शाळेत जात होती. सर्वशिक्षा अभियानांतर्गत तिला लेखणीत विशेष शैक्षणिक साहित्य, मोबिलिटी साहित्य, प्रोेत्साहनभत्ता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. विशेष शिक्षिका भूमेश्वरी वाढई यांनी गौरीला शिकविण्याबरोबरच तिच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण केली.
गौरीचे पित्रृछत्र हरपले असून तिची आई एसटी विभागात वाहक म्हणून काम करते. या सर्व अडचणींवर मात करीत तिने सुमारे ८३.८० टक्के गुण मिळविले आहेत. तिचे हे यश इतर दिव्यांग व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.