पुस्तके दिली.. आता शिकवणी केंद्रांवर जाऊन स्वाध्यायही देणार.. लोक बिरादरी प्रकल्पाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:24 PM2020-07-16T12:24:05+5:302020-07-16T12:28:27+5:30
विद्यार्थ्यांची शिक्षणातील लिंक तुटू नये, शिक्षण प्रक्रिया अविरत सुरू रहावी यासाठी लोकबिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने व समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून ' शिक्षण तुमच्या दारी 'हा अभिनव उपक्रम राबविला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावागावात जाऊन पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावर्षी कोविड-१९ मुळे मार्च महिन्यांपासून सुट्टीवर असलेले विद्यार्थी घरी कंटाळले असून शाळा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
यावर्षी कोविड-19मुळे द्वितीय सत्रांच्या परिक्षा न घेताच विद्यार्थ्यांना मार्चमध्ये घरी सोडण्यात आले. पुढे शाळा कधी सुरू होणार याची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणातील लिंक तुटू नये, शिक्षण प्रक्रिया अविरत सुरू रहावी यासाठी लोकबिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने व समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून ' शिक्षण तुमच्या दारी 'हा अभिनव उपक्रम राबविला होता. यामध्ये मे व जून महिन्यात येथील शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या न घेता विद्यार्थ्यांच्या गावागावात जाऊन, तोंडावर मॉस्क लाऊन, सामाजिक नियमांचे पालन करीत शिक्षण दिले होते. २६ जून २०२० पासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होताच येथील शिक्षकांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गावागावात जाऊन पुस्तकांचे वितरण केले. यामध्ये क्रमिक पुस्तके, अवांतर गोष्टींची पुस्तके, नोटबुक व पेन यांचे वितरण करण्यात आले.
लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील बहुतांश विद्यार्थी हे तालुक्यातीलच आहेत. एकूण १०९ गावांतील ४६९ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तद्वतच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवण्यासाठी गावस्तरावर ग्राम शिक्षण समन्वय समित्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर प्रत्येक आठवड्याला येथील शिक्षक शिकवणी केंद्रावर जाऊन स्वाध्याय तपासून मार्गदर्शन करुन नविन स्वाध्याय व उपक्रम देणार आहेत. ही प्रक्रिया नियमित शाळा सुरू होईपर्यंत घेण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्ष शाळेत येण्याचा विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार असा प्रश्र्न विद्यार्थी विचारत आहेत.