स्पर्धा परीक्षेची तयारी करणार-गायत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:45+5:30
महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. ९६.७७ टक्के गुण प्राप्त करणारी ती आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पहिली विद्यार्थिनी आहे. गायत्री ही देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. वडील एफडीसीएममध्ये मानधन तत्वावर काम करतात. आई गृहिणी आहे. गायत्रीचे आई-वडील, काका, काकू, आजोबा असे संयुक्त कुटुंब आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : बारावीत ९६.७७ गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या देसाईगंज येथील महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री सुधीर सोनटक्के हिने सांगितले की, वैद्यकीय क्षेत्र निवडणे आपल्याला आवडेल. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने परिस्थितीनुसार स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न आहे. माझ्या महाविद्यालयात जे अतिरिक्त वर्ग चालत होते त्यातच माझ्या समस्येचे निराकरण होत होते. त्यामुळे आपल्याला खासगी शिकवणी लावावी, असे कधीच वाटले नाही. अभ्यासात सातत्य ठेवले. मात्र केवळ अभ्यास-अभ्यास केला नाही, अशी प्रतिक्रिया गायत्रीने लोकमतशी बोलताना दिली.
आजपर्यंत सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थिनी
महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. ९६.७७ टक्के गुण प्राप्त करणारी ती आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पहिली विद्यार्थिनी आहे. गायत्री ही देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. वडील एफडीसीएममध्ये मानधन तत्वावर काम करतात. आई गृहिणी आहे. गायत्रीचे आई-वडील, काका, काकू, आजोबा असे संयुक्त कुटुंब आहे. तिने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण आदर्श इंग्लिश हायस्कूलमध्ये घेतले. दहावीत सुध्दा तिने ९२ टक्के गुण मिळविले होते.
धिरजला बनायचे आहे डॉक्टर
बारावीच्या परीक्षेत ९६.३० टक्के गुण प्राप्त करून गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा धिरज भोयर हा विद्यार्थी जिल्ह्यातून द्वितीय आला. एमबीबीएस करून डॉक्टर बनण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. सैनिकी विद्यालयात शिस्त अतिशय कडक असते. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक कसरतही करावी लागते. त्यामुळे सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनतो. १९ वर्ष वय पूर्ण झाल्याने एनडीएची परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे आपण आता वैद्यकीय क्षेत्राकडे वळणार आहे, असे धिरजने सांगितले.
मार्टिनाला बनायचे आहे हृदयरोगतज्ज्ञ
बारावीच्या परीक्षेत ९२.७६ टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून तृतीय आलेल्या प्लॅटिनम ज्युबिली स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी मार्टिना हेमानी हिला हृदयरोगतज्ज्ञ बनायचे आहे. शाळेतील पाच सराव परीक्षांमुळे आणि शिक्षकांकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपण एवढे गुण प्राप्त करू शकलो, असे तिने सांगितले. विशेष म्हणजे मार्टिना हिने दहावीचे शिक्षण प्लॅटिनम ज्युबिली अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमधून पूर्ण केले. त्यावेळी ती जिल्ह्यातून प्रथम आली होती. यावेळीही जिल्ह्यातून प्रथम येण्याचे तिचे स्वप्न प्रकृतीच्या कारणामुळे पूर्ण होऊ शकले नाही.