४० वर्षांनंतर तयार होणार गडचिरोली जिल्ह्याचे गॅझेटिअर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 03:30 PM2023-01-21T15:30:09+5:302023-01-21T15:31:49+5:30
जिल्ह्याच्या इतिहास, भूगोलासह सांस्कृतिक ओळख जगाला कळणार
गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होऊन ४० वर्षे झाली आहेत. उशिरा का होईना आता गडचिरोली जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेटियर (दर्शनिका) तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्याच्या इतिहास, भूगोलाची माहिती आणि सांस्कृतिक वाटचाल यांचा या गॅझेटिअरमध्ये समावेश राहणार आहे.
विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत गॅझेटिअरबाबत माहिती देताना बलसेकर यांनी हे गॅझेटिअर पुढील सहा महिन्यांत तयार करण्याचे नियोजन असल्याने तळमळीने लवकरात लवकर माहिती देऊन हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गॅझेटिअर भविष्यासाठी उत्तम असून पाहिजे असलेली जुनी माहिती, स्थानिक संस्कृती, भौगोलिक रचनेची माहिती त्यातून होते. ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळं, ब्रिटिशकालीन वास्तुशिल्पांची छायाचित्रे गॅझेटिअरसाठी लागणार असल्यामुळे ती गोळा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डाॅ. बलसेकर यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी, तर प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. नरेश मडावी यांनी गॅझेटिअरबाबतची माहिती दिली. डॉ. बलसेकर यांनी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचीही भेट घेतली, तसेच शोधग्राम येथील सामाजिक सेवांबद्दल माहिती जाणून घेतली. त्यानंतर मेंढा लेखा येथे देवाजी तोफा यांचे कार्य जाणून घेतले.
ब्रिटिशांनीही घेतली होती गॅझेटिअरची मदत
गॅझेटिअर हे ब्रिटिशकाळापासून वापरले जाते. ब्रिटिश लोक जेव्हा भारतात आले त्यावेळी येथील भौगोलिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी अवगत नव्हते. त्यावेळी त्यांना गॅझेटिअरची खूप मदत झाली. आजही एखादी माहिती शोधण्याकरिता जुने गॅझेट उपयोगात आणले जाते. उच्च न्यायालयानेही काही निर्णय देताना गॅझेटिअरची मदत घेतली आहे. यावरून गॅझेटिअरचे महत्त्व विशद होते.
बारा प्रकरणांचा समावेश असणार
या गॅझेटिअरमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार १२ प्रकरणांचा समावेश राहणार आहे. यामध्ये जिल्ह्याचा भूगोल, जिल्ह्याचा इतिहास, येथील लोकसंस्कृती, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यापार व वाणिज्य, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थळे आदी प्रकरणांचा समावेश असेल. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग काम करणार आहेत. विदर्भातील इतिहासावर अभ्यास करणाऱ्या गोंडवाना तथा इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांची मदत गॅझेटिअरच्या निर्मितीसाठी घेतली जाणार आहे.