तेंदूपत्ता संकलनाने ग्रामसभा मालामाल
By admin | Published: May 27, 2014 11:41 PM2014-05-27T23:41:28+5:302014-05-27T23:41:28+5:30
गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजाविणार्या ग्रामसभांना बहुतांश गावचे नागरिक उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा तहकूब कराव्या लागतात. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना आरमोरी तालुक्यातील
प्रदीप बोडणे - वैरागड गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजाविणार्या ग्रामसभांना बहुतांश गावचे नागरिक उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा तहकूब कराव्या लागतात. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना आरमोरी तालुक्यातील १२ ग्रामपंचायती मात्र याला अपवाद ठरल्या असून तेंदूपत्ता संकलनाचे योग्य नियोजन करून या ग्रामसभांनी ४५ लाख रूपयाचे तेंदूपत्ता संकलन केले आहे. यातून गावातील हजारो नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. गावाचा विकास गावातील नागरिकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर गावाच्या विकासाची प्रत्येक योजना राबविताना गावकर्यांचा सहभाग राहील, अशा पध्दतीने योजनांचे नियोजन केले जात आहे. वनहक्क कायद्यांन्वये गावाच्या हद्दीतील वनोपज गोळा करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. या अंतर्गत आरमोरी तालुक्यातील कुकडी, नरोटी, नरोटी माल, मेंढा, डोंगरतमाशी, शिश्री, गणेशपूर, कुरंडी (चक), टेंभा (चक), मौशिखांब, मरेगाव, चांभार्डा या १२ गावांनी तेंदूपत्ता संकलन स्वत: करण्याचा निर्णय घेतला. संकलन केलेला तेंदूपत्ता महामंडळाला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. मजुरांना वनविभागाच्या नियमानुसार मजुरी देण्यात यावी, ही अट महामंडळाने घातली. त्यानुसार सर्वच ग्रामसभांनी या अटीचे पालन करीत मजुरांना किमान मजुरी देण्याचे मान्य केले. १२ गावांच्या सभोवताल घनदाट जंगल असून या जंगलात उच्च दर्जाचा तेंदूपत्ता आहे. हजारो मजुरांच्या सहाय्याने तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. १२ ग्रामसभांनी एकूण ४५ लाख रूपयाचे तेंदूपत्ता संकलन केले आहे. यासाठी ग्रामसभांचे प्रमुख गिरीधर कुमरे, रघुनाथ कुमोटी, दिलीप नवघडे, पुरूषोत्तम किरंगे, यादव कुमरे, मनोहर शेंद्रे, रविंद्र कुमरे, पुरूषोत्तम पदा, ऋषी किरंगे, एकनाथ पदा, घनशाम मडावी, रविंद्र किरंगे, पल्लवी कुमरे व गावकर्यांनी सहकार्य केले आहे. तेंदूपत्ता संकलनाने आपला विकास आपणच करू शकतो असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.