सखी मंचच्या महिला सक्षमीकरणाची जर्मनीच्या शिष्टमंडळाने जाणली माहिती
By admin | Published: March 26, 2017 12:45 AM2017-03-26T00:45:11+5:302017-03-26T00:45:11+5:30
भारतातील ग्रामीण विकास, युवक कल्याण व महिला सक्षमीकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी इंडो जर्मन को-आॅपरेटिव्ह मुव्हमेंटचे ...
स्टिना आणि एक्झीनाची लोकमत कार्यालयास भेट
गडचिरोली : भारतातील ग्रामीण विकास, युवक कल्याण व महिला सक्षमीकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी इंडो जर्मन को-आॅपरेटिव्ह मुव्हमेंटचे दोन सदस्यीय शिष्टमंडळ सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या अंतर्गत त्यांनी शनिवारी सकाळी लोकमत जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमत सखीमंचच्याद्वारे चालविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण उपक्रमाची माहिती जाणून घेतली.
यावेळी लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन यांनी स्टिना व एक्झीना या दोन्ही सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यानंतर शिष्टमंडळाच्या सदस्यांनी लोकमत सखीमंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला मालार्पण केले. त्यांना गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात लोकमत सखीमंचच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. लोकमत सखीमंचशी जिल्ह्यातील तीन हजारवर अधिक महिला जुळलेल्या आहे. यांच्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक व प्रबोधनात्मक उपक्रम चालविल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय राज्यस्तरावरही लोकमत सखीमंच चालवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. लोकमतच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कारही केला जातो, असे त्यांना सांगितले.
लोकमत हे महाराष्ट्र व गोव्यातील क्रमांक १ चे दैनिक असून या वृत्तपत्र समुहातर्फे देशभर विविध उपक्रम चालविले जातात. लोकमत केवळ वृत्तपत्रच नसून सामाजिक सुधारणांसाठी अग्रेसर असलेली संस्था असल्याची माहिती त्यांना जर्मन शिष्टमंडळाला दिली. त्यांनी याबाबीचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरताना ही बाब आम्हालाही प्रकर्षाने जाणवली, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील लोकमतच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळे अनुभव व सखीमंचच्या महिला सक्षमीकरण कार्याची प्रेरणा आम्हाला जर्मनीत काम करतानाही वेळोवेळी उपयोगी पडणारी आहे, असे स्टिना व एक्झीना म्हणाल्या.
यावेळी इंडियन इन्स्टिट्युट आॅफ युथ वेल्फेअर गडचिरोलीचे प्रमुख मनोहर हेपट, गडचिरोलीचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, सुरचित हेपट, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे सुनिल चौरसिया, लोकमत बाल विकास मंचच्या संयोजिका किरण पवार, युवा नेक्स्टच्या संयोजिका वर्षा पडघन, विवेक कारेमोरे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)