गेवर्धात दोन तास चक्काजाम
By admin | Published: June 5, 2016 01:13 AM2016-06-05T01:13:21+5:302016-06-05T01:13:21+5:30
आदिवासी विकास महामंडळामार्फत सहकारी संस्थांकडून तालुक्यातील गेवर्धा येथे रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते.
शेतकरी रस्त्यावर : उन्हाळी धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
कुरखेडा : आदिवासी विकास महामंडळामार्फत सहकारी संस्थांकडून तालुक्यातील गेवर्धा येथे रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र गोदाम नसल्याचे कारण पुढे करून गेल्या काही दिवसांपासून महामंडळाने सदर धान खरेदी प्रक्रिया बंद केली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी ९ वाजतापासून ११ वाजेपर्यंत तब्बल दोन तास कुरखेडा-वडसा या मुख्य मार्गावर गेवर्धा येथे वाहतूक रोखून चक्काजाम आंदोलन केले.
या आंदोलनामुळे महामंडळ प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आदिवासी विकास महामंडळ प्रशासनातर्फे गेवर्धा केंद्रावर खरेदी प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे लेखी हमी दिल्यानंतर सदर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, कुरखेडा पं. स. चे उपसभापती बबन बुद्धे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, सरपंच टिकाराम कोरेटी, डॉ. परशुराम खुणे यांनी केले.
यावेळी उपसरपंच संदीप नखाते, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती गणपत उसेंडी, उपसभापती प्रभू नाकतोडे, मनोहर लांजेवार, ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद, देवानंद खुणे, निजामुद्दीन शेख, जावेद शेख, पुंडलिक देशमुख, अशोक कंगाले, खुशाल बन्साडे, खुशाल दखणे, पप्पू शेख, जीवन पर्वते, दिलीप कांबळे, नागोराव नाकाडे, तेजराम बुद्धे, दामोधर बारई, नीलेश खुणे, मुनीश्वर लांजेवार, श्रीकांत गोबाडे, नासिर खान, दयाराम कवडो, हर्षवर्धन मडावी, महादेव म्हस्के, योगेश नखाते आदी उपस्थित होते. आदिवासी विकास महामंडळाने गेवर्धा संस्थेंतर्गत धान खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र गोदामाची साठवणूक क्षमता मर्यादित असल्याने तसेच गोदामातील मालाची उचल न केल्याने येथील धान खरेदी प्रक्रिया बंद केली होती. आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुरखेडा पोलिसांनी सर्व आंदोलकांना स्थानबद्ध करीत ठाण्यात आणले. त्यानंतर काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली.
(तालुका प्रतिनिधी)