पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:57 PM2017-11-14T23:57:47+5:302017-11-14T23:58:00+5:30
आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आ. कृष्णा गजबे यांनी नुकतीच केली. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून हा पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदार व यंत्रणेला यावेळी दिले.
वैरागड-मानापूर मार्गावर बारमाही वाहणारी वैलोचना नदी आहे. सदर मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक गावांची लोकवस्ती असल्याने या गावातील नागरिक थेट मार्ग म्हणून याच रस्त्याचा उपयोग करतात. परिणामी या मार्गावर दररोज दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या नदीला पाणी कमी राहत असल्याने जुन्या कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरळीत चालते. मात्र पावसाळ्यात पर्जन्यमानामुळे वैलोचना नदी दुथळी भरून वाहत असते. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसाने वैलोचना नदीच्या जुन्या पुलावर तीन ते चारदा पाणी चढले होते. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी नवीन उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले. व हे काम गेल्या वर्षाभरापासून सुरू आहे. पाहणीदरम्यान आ. गजबे यांनी सदर पुलाच्या कामात योग्य दर्जा राखण्यात यावा, असेही निर्देश कंत्राटदार व यंत्रणेला दिले. त्यानंतर या परिसरातील धान पीक नुकसानीची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी जि. प. सदस्य संपत आळे, नंदू पेट्टेवार, भाष्कर बोडणे, महेंद्र ताविळे, तंमुस अध्यक्ष सावरकर, उपसरपंच अहीरकर, राजू आकरे आदी उपस्थित होते.
वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय गतीने सुरू आहे. त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळ्यात नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची चिन्ह आहेत.