कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 05:00 AM2021-05-16T05:00:00+5:302021-05-16T05:00:24+5:30

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले. 

Get ready for the third wave of the corona | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; लसीकरणाबाबतचे गैरसमज वेळीच दूर करा

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा ना. शिंदे यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी त्यांनी विविध सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले. 
जिल्ह्यातील १० तालुक्यांसाठी मंजूर केलेले १० ऑक्सिजन जनरेशन प्लांट तातडीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी प्रशासनाला केली. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांशी दिवसातून २ वेळा तरी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. या ऑनलाइन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला, सीईओ कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जि. आ. अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते. 

लसीकरणासाठी व्यापक जनजागृतीची गरज 
जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती जाणून घेताना या भागातील आदिवासी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन आदिवासींच्या मनातील ही भीती दूर करण्याचे प्रयत्न करा, असे पालकमंत्री म्हणाले.

मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने मान्सूनच्या परिस्थितीचा आढावादेखील यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यातील नागरिकांना ३ महिन्यांच्या रेशनचा पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचुदंश यावरील औषधांचा सर्व तालुक्यातील आरोग्य केंद्रात साठा करून ठेवणे, जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे अशी सर्व मान्सूनपूर्व कामे  वेळीच पूर्ण करावीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा  येत्या १५ दिवसांत करून ठेवावा, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत प्रशासनाला केल्या.

लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. त्यासोबतच सध्या राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगासाठी लागणारी सारी सज्जता करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या रोगात रुग्णांचा मृत्युदर जास्त असल्याने जिल्ह्यात याचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्यास त्यांनी सांगितले. या रोगाची औषधे महाग असल्याने त्यांचा पुरेसा साठा आधीच करून ठेवावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचशे इंजेक्शन्सची ऑर्डर दिल्याची माहिती दिली. 

 

Web Title: Get ready for the third wave of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.