व्यसनविरोधी अभियानाचे मुक्तीसैनिक व्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:38 PM2018-12-31T22:38:54+5:302018-12-31T22:39:19+5:30
२०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे. अशी स्थिती सर्वत्र असताना गडचिरोलीची तरुणाई व्यसन विरोधी अभियानात सहभागी होत असल्याची बाब अभिनंदनीय आहे. ही युवा पिढी अशीच व्यसनमुक्त राहण्यासाठी दारूच्या पहिल्या घोटापासूनच त्यांनी दूर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यसन विरोधी अभियानाचे मुक्तीसैनिक होऊन व्यसनमुक्तीच्या लोकलढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केले.
नव्या वर्षाचे स्वागत सर्वांनी आनंदी आणि शुद्धीत राहून करावे, सोबतच युवा वर्गाने व्यसनमुक्त राहण्याचा निर्धार करावा यासाठी मुक्तिपथ अभियान आणि राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने युवा वर्गाच्या सहभागातून ३१ डिसेंबर रोजी शहरात व्यसनविरोधी मानवी साखळी तयार करून व्यसनमुक्तीची हाक देण्यात आली. या अभियानात सहभागी होत डॉ. बंग यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर उपस्थित होते. थोडीशी गम्मत म्हणून सुरु झालेली दारूची मजा संपूर्ण शरीराचा ताबा घेते. त्यामुळे हिंसा, अत्याचार, अपघात या प्रकारांच्या मुळाशी दारूचे व्यसन असते. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात या वर्षात दारूमुळे ३०० वर अपघात झाले आहे. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी सर्वांनी व्यसनमुक्त होण्याची गरज त्यांनी व्यक्त करतानाच या मानवी साखळीतून हा संकल्प युवा वगार्तून प्रगट झाल्याचे डॉ. बंग यावेळी म्हणाले.
दारू पिऊन होत असलेले अपघात आणि त्या अपघाताचा कुटुंबावर पडणारा प्रभाव दाखविणारे पथनाट्य शासकीय विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. सर्वांनी हातात हात घेऊन व्यसनविरोधी मानवी साखळी यावेळी तयार केली. शिवाजी महाविद्यालय, इंदिरा गांधी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, फुले, शाहू, आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, आयटीआय, कृषी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालयातील आणि एकूण २१६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
चौकात लागला आरसा
शहरात दारूविक्री होणाऱ्या जागा, त्यांची संख्या, या महिन्यात झालेली कृती आणि या कृतीमुळे बंद झालेली दारू हे दर्शविणारा ‘गडचिरोली शहराचा आरसा’ असलेला फलक शहराच्या मध्यभागी गांधी चौकात यावेळी लावण्यात आला. डॉ. अभय बंग यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. किती जागी पोलिसांनी कारवाई केली हे प्रत्येक महिन्यात या आरशावर लिहिले जाणार आहे.