पाईपलाईन असूनही पाणी मिळेना
By admin | Published: June 2, 2016 02:56 AM2016-06-02T02:56:46+5:302016-06-02T02:56:46+5:30
गावाच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकले नाही.
राजपूर पॅचवासीय त्रस्त : पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
अहेरी : गावाच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकले नाही. अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच ग्रामपंचायतीमध्ये हे वास्तव आहे.
अहेरी तालुक्यातील बोरी व राजपूर पॅच या ग्रामपंचायती समोरासमोर आहेत. आष्टी-आलापल्ली मार्गाने या ग्रामपंचायतींची विभागणी झालेली आहे. या मार्गाच्या एका बाजुला बोरी तर दुसऱ्या बाजूला राजपूर पॅच ग्रामपंचायतीची हद्द आहे. काही दिवसांपूर्वी राजपूर पॅच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोरी ग्रा. पं. च्या नावाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रूपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आले. त्यानंतर अनेक वर्ष ही योजना शोभेची वास्तू म्हणून उभी होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून बोरी व राजपूर पॅच ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र या योजनेतून राजपूर पॅचसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाईपलाईन टाकूनही पाणी मिळेना, अशी स्थिती राजपूर पॅचमध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक राजपूर पॅच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोरी ग्रामपंचपयतीच्या नावाने जलकुंभ उभारण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गावात पाईपलाईन टाकूनही पाणी मिळत नसल्याने राजपूर पॅचवासीयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत राजपूर पॅच येथील ग्रामसभेत बोरी नळयोजनेत राजपूर पॅचचा समावेश करावा, असा ठराव घेऊन तो बोरी गामपंचायतीला पाठविण्यात आला. मात्र महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीला योजना हस्तांतरित झालेली नाही.
योजना हस्तांतरित झाल्यानंतर पाहू, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावाच्या हद्दीत नळयोजना असूनही नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने बोरीच्या योजनेतून राजपूर पॅचचा समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)