शिक्षक पतीला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:33 AM2018-05-03T00:33:22+5:302018-05-03T00:33:30+5:30
आलापल्ली येथील समीना महेमुद शेख हिने आत्महत्या केलेली नाही. तिचा पती महेमुद शेख याचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून पती-पत्नीत वाद होत होते. यातूनच महेमुद शेख याने पत्नी समीनाचा खून केला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली येथील समीना महेमुद शेख हिने आत्महत्या केलेली नाही. तिचा पती महेमुद शेख याचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून पती-पत्नीत वाद होत होते. यातूनच महेमुद शेख याने पत्नी समीनाचा खून केला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी विदर्भ राज्य ग्रामीण-शहरी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह समिनाच्या आईवडीलांनी पत्रपरिषदेतून केली.
पत्रकार परिषदेला पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष किशोर पोतणवार, रिपाईचे गोपाल रायपुरे, पुरोगामी महिला मंडळाच्या अध्यक्षा यशोधरा पोतनवार, समिनाचे वडील बशीर नजीर शेख, आई जुबेदा बशीर शेख, समीर बशीर शेख, जमीर बशीर शेख, रशीद नजीर शेख, अफसर शेख, शौकत शब्बीर अली, सलीम कादर शेख उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ७ एप्रिल २०१८ रोजी समीनाने आत्महत्या केली असल्याचा निरोप पती महेमुद शेख याने पहाटे ६ वाजता समीनाचा भाऊ जमीर याला दिला. अहेरी येथून समीनाचे वडिल शेख बशीर नजीर शेख व भाऊ जमीर आलापल्ली येथे समीनाच्या घरी गेले. यावेळी समीनाला पलंगावर झोपवून ठेवण्यात आले होते. महेमुद शेख हा जिमलगट्टा येथील जि.प. शाळेत शिक्षक आहे. त्याने एक स्टॅम्प पेपर आणून त्यावर त्यांच्या धर्मात शवविच्छेदन करण्यात येत नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार न देता तसेच शवविच्छेदन न करताच दफनविधी करण्यासाठी समीनाचे वडिल तसेच नातेवाईकांची सही घेतली. यानंतर दफनविधी उरकला. मात्र समीनाचा भाऊ समीर याला समीनाने गळफास घेतल्याच्या घटनेवर विश्वास बसत नव्हता. यामुळे त्याने ८ एप्रिल रोजी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. अहेरी पोलिसांनी दफन केला मृतदेह उकरून काढून शवविच्छेदन केले. यावेळी समीनाचा मृत्यू हँगीगने झाल्याचे अहवालात नमूद असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.