घोट-चामोर्शी मार्ग गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:47 AM2017-09-01T00:47:57+5:302017-09-01T00:48:56+5:30

Ghat-Chamorshi route goes in the potholes | घोट-चामोर्शी मार्ग गेला खड्ड्यात

घोट-चामोर्शी मार्ग गेला खड्ड्यात

Next
ठळक मुद्देपुलावर खड्डेच खड्डे : वाहतुकीस अडथळा, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : गेल्या अनेक दिवसांपासून चामोर्शी तालुक्याच्या घोट-चामोर्शी मार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनाची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र या मार्गावर रेखेगाव (भाडभिडी) फाटा ते गौरीपूरच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. शिवाय सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
या मार्गावर पुलाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर पुलाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी या पुलानजीक खड्डे निर्माण झाले असून पावसाचे पाणी साचले आहे. संबंधित यंत्रणेने येथे माती व मुरूम टाकून सदर खड्डे थातुरमातूर बुजविले. मात्र चार दिवसात आलेल्या पावसाने या खड्ड्यातील माती उखडून गेली. परिणामी खड्डे जैसे थे झाले.
घोट-चामोर्शी हा डांबरी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र सदर रस्त्याच्या दुरवस्थेकडे या यंत्रणेचे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यताही वाढली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या मार्गावर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात घडले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना सुद्धा सदर रस्त्याच्या दुवस्थेमुळे दरवर्षी तोटा सहन करावा लागत आहे. खासगी वाहनेही भंगार होत आहेत. या मार्गावर दोन वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या मार्गावर सुरळीत व सुरक्षित वाहतूक होण्यासाठी सदर पुलाचे काम पूर्ण करून मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी घोट परिसरातील वाहनधारकांनी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिक याच मार्गाने घोट व चामोर्शीकडे ये-जा करतात. मात्र दुरवस्थेने वाहनधारकांचा प्रवास खडतर बनला आहे.

Web Title: Ghat-Chamorshi route goes in the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.