संशयातून पत्नीशी वाद घातला अन् आतेबहिणीवर सूड उगवला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:02 PM2023-08-02T14:02:04+5:302023-08-02T14:05:52+5:30
भरझोपेत चाकूने वार : रंगयापल्लीतील खुनाचा तीन आठवड्यांनंतर उलगडा
कौसर खान
सिरोंचा (गडचिरोली) : आई- भाऊ दारात झोपलेले असताना घरात खाटावर झोपलेल्या १९ वर्षीय युवतीवर शस्त्राने वार करुन खून केल्याची थरारक घटना १४ जुलै रोजी अतिदुर्गम रंगयापल्ली गावात घडली होती. ठोस पुरावे हाती नसताना सिरोंचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्याची उकल करत आरोपीला बेड्या ठोकत 'कानून के हात लंबे होते है...' याचा प्रत्यय दिला. मृत युवतीचा मामेभाऊच मारेकरी निघाला. चारित्र्यावर संशय घेत पत्नीशी वाद घालून त्याने आतेबहिणीचा काटा काढल्याचे उघड झाले.
ओलिता रामया सोयम (१९, रा. रंगयापल्ली, ता. सिरोंचा) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. मृत ओलिता ही अविवाहित असून १३ जुलै रोजी रात्री घरात खाटेवर झोपली होती. १४ जुलै रोजी ओलिताचा भाऊ बुचया रामया सोयम (२८) हा झोपेतून उठला व अंथरुण पांघरुण ठेवण्यासाठी आतील खोलीत गेला. यावेळी खाटेखाली रक्त आढळल्याने तो हादरला. बुचया सोयम याच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, कुटुंबीयाचा कोणावर संशय नव्हता की कुठलेही ठोस पुरावे होते, त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान सिरोंचा पोलिसांपुढे होते.
ठाणेप्रमुख व पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, उपअधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे गतिमान केली. अखेर १ ऑगस्ट रोजी स्वामी मलय्या आत्राम (३५,रा.रंगयापल्ली) यास अटक केली. तो मृत ओलिताचा मामेभाऊ आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, उपनिरीक्षक शीतल धविले, दिनेश कोळी, हवालदार राजू चव्हाण, शिपाई बाजीराव मुंडे, शत्रुघ्न भोसले, सुनील घुगे, प्रकाश मोरे, राकेश नागुला यांनी कारवाईत सहभाग घेतला.
८० जणांची चौकशी.. पती- पत्नीतील विसंगतीने वाढला संशय
पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ८० जणांचे जबाब नोंदवून कसून चौकशी करावी लागली. स्वामी आत्राम याच्या पत्नीची मृत ओलिताशी घट्ट मैत्री होती. दोघी रोजंदारीने सोबत कामाला जात. तिची व स्वामीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दोघांच्या बोलण्यात विसंगती आढळली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता स्वामी आत्राम गडबडला. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.
'त्या' रात्री नेमके काय झाले?
स्वामी मलय्या आत्राम हा दारुच्या आहारी गेलेला आहे. पत्नी रोजंदारीने काम करते. त्यांना दोन मुले आहेत. मृत ओलिता व स्वामीचे घर जवळच आहे. नातेवाईक असल्याने घरी येणे-जाणे होते. ओलिताचे पत्नीकडे सतत येणे त्यास आवडत नसे. ओलिताचा फोन पत्नीने वापरण्यासाठी घेतला होता, त्यामुळे त्याने पत्नीला टोकले होते. शिवाय ओलिताच्या घरी जाऊन तिच्या आईलाही त्याने आमच्या घरी ओलिताला येऊ देऊ नका, असे बजावले होते.
१२ जुलै रोजी स्वामीच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता, तेव्हा ओलिता दोन दिवस त्यांच्या घरी होती. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीशी वाद घातला. त्यानंतर ओलिताच्या घरी गेला. दरवाजा फक्त लोटलेला होता. तो ढकलून आत शिरला व झोपेत असलेल्या ओलितावर चाकूने वार करुन पुन्हा स्वत:च्या घरी येऊन झोपी गेला, ओलिताच्या अंत्यसंस्काराला व तिच्या कुटुंबीयांनाही तो भेटायला गेला नाही.