दुर्दैवी! भावाच्या हातावर राखी बांधण्याआधीच तिच्यावर काळाने घातली झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 01:49 PM2022-08-05T13:49:02+5:302022-08-05T13:52:21+5:30
राखी घेण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले
आरमोरी (गडचिरोली) : एक आठवड्यावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनासाठी आपल्या मावशीच्या मुलासाठी (मावसभावासाठी) राखी घेण्यासाठी मैत्रिणींसोबत सायकलने दुकानात जाणाऱ्या विद्यार्थिनीला काळ बनून आलेल्या ट्रकने चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ऐन या भावनिक सणाच्या तोंडावर मावसभावाच्या हातावर राखी बांधण्याआधीच त्या बहिणीला काळाने हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रांजली नितेश भानारकर (१७ वर्षे) रा. मोहझरी असे त्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास आरमोरीत घडला. आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील रहिवासी असलेली प्रांजली आरमोरी येथील वसतिगृहात राहून महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिला सख्खा भाऊ नसल्याने ती दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला आपल्या मावसभावाला राखी बांधत होती.
या वर्षी रक्षाबंधनाचा सण अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेवल्याने प्रांजली एका मैत्रिणीला घेऊन राख्या पाहण्यासाठी सायकलने निघाली होती. देसाईगंज मार्गावरील एका दुकानात त्या दोघी जात असताना देसाईगंजवरून आरमोरीकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच २० सीटी ४०४१) प्रांजलीला जबर धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला तत्काळ आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाला.
ट्रक रस्त्यालगत ठेवून चालक पसार
या अपघातानंतर नागरिक आपल्याला सोडणार नाही, हे लक्षात येताच ट्रकचालकाने आरमोरी-ब्रह्मपुरी रस्त्यालगत ट्रक उभा ठेवला आणि तो तेथून पसार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालकाचा शोध सुरू आहे. सदर घटनेने आरमोरीसह मोहझरी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, नातेवाईक आणि आरमोरीतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.