विद्यार्थिनींनी एक तास बस रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:58 PM2017-09-08T23:58:16+5:302017-09-08T23:58:33+5:30
मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली. यामुळे येथे काही काळ खळबळ निर्माण झाली होती.
या संदर्भात विद्यार्थिनींनी थेट मुलचेरा पोलीस ठाणे गाठून पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोपरअल्ली परिसरातील मल्लेरा, कोळसापूर, विश्वनाथ नगर, कोपरअल्ली परिसरातील ६० ते ७० विद्यार्थी मुलचेरा येथे शिक्षणासाठी येतात. गुरूवारला ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुलचेरा-नरेंद्रपूर या बसला हात दाखविला असता, सदर बस न थांबता ती थेट मुलचेरा येथे निघून गेली. यावेळी विद्यार्थ्यांना पायपीट करीत शाळा गाठावी लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी मुलचेराचे नगराध्यक्ष सुभाष आत्राम यांच्या नेतृत्वात तब्बल एक तास मानव विकास मिशनची बस रोखून धरली. या बाबीची माहिती कळताच मुलचेराच्या पोलीस निरिक्षकांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थिनींची समजूत काढली. तसेच तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थिनींनी तहसीलदार व पोलीस निरिक्षकांना निवेदन दिले.
मुलचेरा मार्गावर सकाळी ७ वाजताची बस सुरू न झाल्यास शनिवारी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुभाष आत्राम, शितल मोहुर्ले, पल्लवी आत्राम, गोपिका नैताम यांच्यासह विद्यार्थिनी हजर होत्या.