जीआयएस सर्वेची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:17 PM2018-08-06T23:17:02+5:302018-08-06T23:17:46+5:30
मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी गडचिरोली शहरात एका खासगी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जीआयएस (ग्लोबल इन्फारमेशन सिस्टिम) सर्वे केला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्वे सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत सर्वेचे काम पूर्ण झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी गडचिरोली शहरात एका खासगी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जीआयएस (ग्लोबल इन्फारमेशन सिस्टिम) सर्वे केला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्वे सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत सर्वेचे काम पूर्ण झाले नाही.
नगर परिषदेच्या हद्दित येणाºया मालमत्तेवर नगर परिषदेच्या वतीने कर आकारला जातो. यामध्ये प्रामुख्याने इमारतीचा समावेश होतो. दर चार वर्षाने पुनर्मुल्यांकनाचे काम केले जाते. यासाठी सर्वे करावा लागतो. शासनाच्या निर्देशानुसार जीआयएस सर्वे केला जात आहे. सर्वे करण्याचे काम एका खासगी स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले आहे. संस्थेने नेमलेले प्रतिनिधी प्रत्यक्ष घरी जाऊन घराचे मापण करीत आहेत. सदर काम सहा महिन्यांचा कालावधी आटोपला तरी अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. सर्वेक्षणाला सुरूवात झाली. त्यावेळी २० कर्मचाºयांच्या मार्फत सर्वे केला जात होता. आता मात्र केवळ सहा कर्मचारी शिल्लक आहेत. मनुष्यबळ कमी झाल्याने कामाची गती मंदावली आहे. परिणामी सर्वेचे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. अजुनही काही वार्डांमधील घरांचे सर्वेक्षण झाले नाही. सर्वेक्षणाची प्रक्रिया तत्काळ आटोपावी, अशी मागणी आहे.
नागरिकांच्या विरोधामुळे विलंब
राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक घरातील खोलीचे मोजमाप घ्यायचे आहेत. त्यानुसार सर्वे करणारे कर्मचारी घरात शिरून लेजर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराची लांबी, रूंदी तसेच खोलीची लांबी रूंदी मापत आहेत. मात्र काही नागरिकांनी याला विरोध केला आहे. हे चुकीचे असून राज्य शासनाच्या निर्देशानुसारच काम केले जात आहे, अशी माहिती नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिली आहे. एकही घर सर्वेपासून वंचित राहू नये, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरी दोन ते तीन वेळा जाऊन त्यांना सर्वे करण्याबाबत विनवणी केली जात आहे. यामुळेही सर्वेक्षणास विलंब होत आहे.
दीड वर्षांपासून नवीन घर टॅक्सची आकारणी रखडली
जीआयएस सर्वे करण्याच्या पूर्वी एक वर्षाअगोदरपासूनच नवीन घरांचा टॅक्स लावण्याचे काम बंद करण्यात आले. एकंदरीत दीड वर्षांपासून नवीन घर टॅक्स आकारणी बंद पडली आहे. काही नागरिकांना घर टॅक्स पावतीची गरज भासते. घर असूनही पावती नसल्याने प्रशासकीय कामे रखडली आहेत. त्यामुळे जीआयएस सर्वे पूर्ण करावा, अशी मागणी आहे.
अनेक घरे घरटॅक्सविना
गडचिरोली शहरात एकूण ११ हजार घरे असावी, असा अंदाज नगर परिषदेने बांधला. त्यानुसार उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात सर्वे करणाऱ्यांना १२ हजार १८१ घरे आढळून आली आहेत. अजुनही सर्वेचे काम सुरूच आहे. त्यामुळे आणखी घरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून सदर घरे आजपर्यंत घरटॅक्सविनाच होती. आता या घरांवर सुरूवातीपासूनच कर आकारला जाणार आहे.