गरजूंना अंत्योदय योजनेचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:44 AM2018-08-11T01:44:55+5:302018-08-11T01:46:57+5:30
तालुक्यात गरीब एपीएलधारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्नधान्य व केरोसीनचा लाभ द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यात गरीब एपीएलधारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्नधान्य व केरोसीनचा लाभ द्यावा, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या नेतृत्वात आविसं पदाधिकाºयांनी शुक्रवारी सिरोंचाचे नायब तहसीलदार एच. एस. सय्यद व एस. एस. इंगळे यांची भेट घेऊन तालुक्यातील गरीब व गरजू एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी चर्चा केली. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथील शेकडो एपीएल शिधापत्रिकाधारक व अन्य कुटुंब प्रमुख शुक्रवारी येथील तहसीलदार कार्यालयावर धडकले. यावेळी जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती जनगाम यांनी नायब तहसीलदारांशी चर्चा केली. तालुक्यातील अनेक नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्न-धान्य व केरोसीन मिळत नसल्याची तक्रार आपल्याकडे नागरिकांनी केली. अनेक कुटुंबाचे जीवन हलाखीचे असतानाही त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा. सदर लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील हजारो कुटुंब धारकांना अन्न धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. निवेदन देतांना आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, मारोती गणपुरापु, दंदेरा समय्या, आदे वेंकटेश, पोचन्ना ताडबोईना, लग्गा रमेश, मोरला समया, सुजाता कुराणा उपस्थित होते.
फेरसर्वेक्षण करा
तालुक्यातील सर्व एपीएल शिधापत्रिका कुटुंबधारकांच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण करून आसरअल्लीसह तालुक्यातील सर्व एपीएल शिधापत्रिका कुटुंब धारकांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून त्यांना अन्न-धान्यासह केरोसीन मिळवून द्यावा, अशी मागणी मागणी सभापती जनगाम यांनी केली.