गोदावरीच्या पुलाला आबांचे नाव द्या!

By admin | Published: December 29, 2016 01:46 AM2016-12-29T01:46:18+5:302016-12-29T01:46:18+5:30

तेलगंणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला तत्कालीन पालकमंत्री आर.

Give Godavari bridge the name of AAB! | गोदावरीच्या पुलाला आबांचे नाव द्या!

गोदावरीच्या पुलाला आबांचे नाव द्या!

Next

सोशल मीडियावरूनही प्रचार : राष्ट्रवादीसह सिरोंचा तालुक्यातील जनतेची मागणी
गडचिरोली : तेलगंणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच गती आली. तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने या पुलाच्या कामासाठी ३५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आता या पुलाचे लोकार्पण होत आहे. भाजपप्रणीत सरकारने या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह सिरोंचा तालुक्यातील व गडचिरोलीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सिरोंचा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा तालुका आहे. या तालुक्याचा दैनंदिन व्यवहार तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये चालतो. या भागात १४ वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गही मंजूर करण्यात आला. अनेक लोक गोदावरी नदीतून नावेने तत्कालीन आंध्रप्रदेश राज्यात जात होते. सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीवर पूल बांधल्या गेला पाहिजे, ही पालकमंत्री आर. आर. पाटील यांची भावना होती. गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व २०१० मध्ये स्वीकारल्यानंतर त्यांनी वेळोवेळी सिरोंचाला भेटी देऊन या पुलाच्या जागा प्रस्तावित करण्यापासून ते या कामाचे भूमिपूजन करून त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. स्थानिक खासदार व आमदारांनाही या कामात सोबत घेतले व या पुलाच्या कामाला गती दिली. आज तेलंगणाची बससेवा थेट सिरोंचापर्यंत येऊ लागली आहे. आर. आर. पाटील यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे हा पूल पूर्णत्वास आला. त्यामुळे विद्यमान केंद्र व राज्य सरकारने आर. आर. पाटील यांचे नाव या पुलाला देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, अशी भावना गडचिरोली जिल्हावासीयांसह सिरोंचा तालुकावासीयांचीही आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आर. आर. पाटील यांच्या स्मारकासाठी निधीही मंजूर करून राजकारणातील एक मोठा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव देण्याचेही काम मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
३० डिसेंबर रोजी राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथे या पुलाचे लोकार्पण होऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावरही आबांचे नाव देण्याबाबत प्रचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीतून हा पूल झाला आहे. तेलंगणातूनही स्थानिक आमदारांचे नाव पुलाला द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हा संपूर्णत: निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे आपल्याला काहीही सांगता येणार नाही, असे सांगून अप्रत्यक्षरित्या पुलाच्या नावाबाबतच्या प्रश्नाला बगल दिली.

गोदावरील नदीच्या पुलाचे काम तत्कालीन गृहमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने झाले. सरकारने या पुलाचे लोकार्पण करताना आर. आर. पाटील यांचे नाव या पुलाला दिले पाहिजे, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठी प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. वॉट्सअ‍ॅप, फेसबुक याच्या माध्यमातूनही लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात हा यामागचा हेतू आहे.
- श्रीनिवास गोडसेलवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली

Web Title: Give Godavari bridge the name of AAB!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.