आरोग्य कर्मचाऱ्यांना हार्डशिप भत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:39 AM2017-12-20T01:39:47+5:302017-12-20T01:42:05+5:30
आरोग्य विभागातील केवळ महिला कर्मचाऱ्यांना हार्डशिप अलाऊन्स दिला जातो. पुरूष कर्मचाऱ्यांनाही हार्डशिप अलाऊन्स मंजूर करावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरोग्य विभागातील केवळ महिला कर्मचाऱ्यांना हार्डशिप अलाऊन्स दिला जातो. पुरूष कर्मचाऱ्यांनाही हार्डशिप अलाऊन्स मंजूर करावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे आरोग्य आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बायोमेट्रिक प्रणालीनुसार आरोग्य कर्मचारी एका ठराविक वेळेत थम्ब मारू शकत नाही. त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या वेळेस बायोमेट्रिक थम्ब मारावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची वेळ निश्चित करून त्यानुसार मार्गदर्शन करावे, दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या गंभीर असल्याने सॉप्टवेअरमध्ये माहिती भरणे शक्य होत नाही. याकरिता तालुकास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी, जिल्ह्यात ६० टक्के भाग अतिशय दुर्गम आहे. शासनाच्या बदली धोरणानुसार आरोग्य कर्मचारी हा १० वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी सेवा देत असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम करण्याचे मनोधैर्य खचले आहे. पोलीस विभागाच्या धर्तीवर तीन वर्षांनी अतिदुर्गम भागातील कर्मचाºयांची बदली करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा आयुक्तांसोबत चर्चा केली. शासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे दुर्गम व आदिवासी भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे मन खचले आहे. त्यामुळे या समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी चर्चेदरम्यान केली. निवेदन देतेवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, विनोद सोनकुसरे, अनिल मंगर, आनंद मोडक उपस्थित होते.