कमकुवत वर्गाला न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:54 AM2017-12-21T00:54:21+5:302017-12-21T00:54:57+5:30
शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्तरावर विधीसेवा सहाय्य चिकित्सालयाची निर्मिती करण्यात येत आहे. येथे कायदेविषयक मोफत सल्ला विधी तज्ज्ञांद्वारे उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्तरावर विधीसेवा सहाय्य चिकित्सालयाची निर्मिती करण्यात येत आहे. येथे कायदेविषयक मोफत सल्ला विधी तज्ज्ञांद्वारे उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा सामान्य नागरिकांना लाभ व्हावा, तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आर्थिक कारणाने न्याय हक्कांपासून वंचित राहू नये, या वर्गालाही न्याय द्यावा, असे प्रतिपादन दिवाणी व फौजदारी न्या. एम. आर. बागडे यांनी केले.
नगर पंचायत व दिवाणी व फौजदारी न्यायालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कुरखेडा येथे विधी सहाय्य चिकित्सालयाचे शुभारंभ न्या. बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना न्या. बागडे बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, मुख्याधिकारी मयूर भुजबळ, बांधकाम सभापती सोनू भट्टड, पाणीपुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, नगरसेवक बबलू हुसैैनी, रामहरी उगले, शाहेदा मुघल, अर्चना वालदे, नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, रूपाली देशमुख, अॅड. छन्ना जनबंधू, अॅड. गोकुल नागमोती उपस्थित होते. अॅड. उमेश वालदे यांनी विधी चिकित्सालयाची संकल्पना सांगितली.
संचालन अॅड. रूपाली माकडे तर आभार नामदेव कोसरे यांनी मानले. विधी चिकित्सालयात विधी तज्ज्ञ म्हणून अॅड. रूपाली माकडे, सहायक म्हणून अल्का बावनथडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस नागरिकांना येथे मोफत कायदेविषयक सल्ला दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला न्यायालय व नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.