प्रलंबित वनहक्क पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:45 AM2017-07-18T00:45:30+5:302017-07-18T00:45:30+5:30
तालुक्यातील अनेक गावात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वर्षानुवर्षे शेतकरीबांधव शेती कसून आपली उपजीविका करीत आहेत.
तहसीलदारांना निवेदन : आदिवासी विद्यार्थी संघ व शेतकऱ्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील अनेक गावात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वर्षानुवर्षे शेतकरीबांधव शेती कसून आपली उपजीविका करीत आहेत. परंतु या शेतकऱ्यांना अद्यापही वनहक्क पट्टे वितरित करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी वारंवार तालुका व जिल्हा मुख्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे वितरित करावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ व शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार अतुल चोरमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिकरित्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून शेतीतून उत्पादन काढत आहेत. या उत्पादनावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वनहक्क दावे सादर केले होते. परंतु त्यांच्या दाव्यांमध्ये प्रशासनाने त्रूट्या काढून दावे प्रलंबित ठेवले.
सर्व प्रलंबित दाव्यांमधील त्रूट्या दूर करून कायमस्वरूपी वनहक्क पट्टे मिळवून देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने केली आहे.
सिरोंचाचे तहसीलदार अतुल चोरमारे यांची आविसं पदाधिकाऱ्यांन तहसील कार्यालयात भेट घेऊन प्रलंबित वनहक्क दावे आणि नवीन दावे दाखल करण्याविषयी चर्चा केली. यावेळी आविसं पदाधिकाऱ्यांनी बामणी, ग्लासफोर्डपेठा परिसरातील जवळपास २० अतिक्रमणधारक नागरिकांचे नवीन वनहक्क दावे कायमस्वरूपी पट्टे मिळण्यासाठी तहसीलदारांकडे दाखल केले.
तहसीलदारांनी प्रलंबित दाव्यांसह नवीन दाव्यांचीसुद्धा वनहक्कासंबंधी कायम पट्टे मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून लवकरच सर्वांना कायम पट्टे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आविसंचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, माजी उपसरपंच रवी सल्लमवार, ग्रा. पं. सदस्य रोहन अल्लूरी, कृउबासचे संचालक कुम्मरी सडवली, रवी बोंगोनी यांच्यासह बामणी परिसरातील शेतकरी हजर होते.