मन्नेवार समाजाला जातवैधता प्रमाणपत्र द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:22 AM2018-11-21T01:22:14+5:302018-11-21T01:22:51+5:30
आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील मन्नेवार समाजाच्या नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी जिल्हाभरातील मन्नेवार समाजाच्या नागरिकांनी सिरोंचा तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
सिरोंचा येथील मन्नेवार समाज भवनापासून मोर्चाला सुरूवात झाली. गांधी चौक, नेहरू चौक, बसस्टॅन्ड चौकातून मोर्चा काढण्यात आला. हातात घोषवाक्य लिहिले फलक घेऊन घोषणा देत मोर्चा तहसीलवर धडकला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. मन्नेवार समाजातील अनेक नेत्यांनी भाषणाच्या माध्यमातून मन्नेवार समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत चिड व्यक्त केली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात आदिवासी मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, या समाजाचे मुंबई येथील टाटा इंस्टिट्युट या संस्थेद्वारे संशोधन करावे, जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित ठेवणाऱ्या गडचिरोली येथील पडताळणी समितीवर कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व बंदेला बापू, दुमपला लक्ष्मण, श्यामलता कालवा, लक्ष्मीबाई पोचमपल्लीवार, सरोजना गंजीवार, अनिल पोचमपल्लीवार, सुरेश गड्डमवार, किरण संगेम, रूपेश संगेम, रवी सल्लमवार, सतिश भोगे, रवी मलमपेद्दी, सागर बुच्चावार, सागर मुलकला, किष्टय्या परसा, परकी रमेश, परकी सत्यम, शाजलिंगू रादंडी, तलारी सारय्या, रमेश पत्तुला, श्याम दुलम यांनी केले. मोर्चात अहेरी व सिरोंचा तालुक्यासह जिल्हाभरातील मन्नेवार समाजाचे शेकडो नागरिक सहभागी झाले होते.