एटापल्लीत उपजिल्हा रूग्णालय द्या
By admin | Published: July 10, 2017 12:32 AM2017-07-10T00:32:54+5:302017-07-10T00:32:54+5:30
टापल्ली तालुक्यात १९७ गावे असून या तालुक्यात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा तोकड्या आहेत.
पालकमंत्र्यांना निवेदन : भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात १९७ गावे असून या तालुक्यात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा तोकड्या आहेत. शिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी व व्यवस्थेअभावी रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे एटापल्लीतील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी एटापल्ली येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
या संदर्भात भाजपचे एटापल्ली शहर महामंत्री सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली हे तालुक्याचे ठिकाण असून येथे एकमेव ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र या रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा नसल्याने येथील रूग्ण अहेरी व गडचिरोलीला रेफर केले जातात.