निराधारांना शाेधून याेजनांचा लाभ द्या, राज्यमंत्री बच्चू कडूंचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 04:18 PM2022-05-19T16:18:07+5:302022-05-19T16:27:02+5:30
मंत्री कडू यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला
गडचिराेली : समाजात अनाथ मुले, विधवा, दिव्यांग तसेच व्हीजे-एनटीमधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र नागरिक योजना माहीत नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असहाय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वत:हून त्याठिकाणी मदत करणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थितांना दिल्या.
मंत्री कडू यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला. शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्या महिला व बालके पात्र होतात. त्याची माहिती त्यांना देऊन योजनेत सामावून घेण्यासाठी अभियान स्तरावर कामे पूर्ण करावीत. या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेंतर्गत येणारे विषय राज्यमंत्री यांना सादरीकरणाद्वारे सांगितले. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील व संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
महिला अर्थिक विकास महामंडळामार्फत प्रत्येक तालुक्यातून दोन तीन गटांचे उद्योग व्यवसाय वाढतील, यासाठी नियोजन करावे. यातून इतरांना पाठबळ मिळेल व आपोआपच गटांमार्फत व्यवसाय उभारणीला चालना मिळेल, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले. व्हीजे-एनटीमधील जिल्ह्यातील एकूण नेमकी लोकसंख्या काढून त्यांना किती प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळाला, याबाबत माहिती घेण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले.
माेहफुलावर प्रक्रिया उद्याेग निर्मिती करा
जिल्हा राज्यात सर्वात जास्त मोह असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बचत गटांना मोह प्रक्रियेवर उद्योग उभारणीला मोठा वाव आहे. त्याकरिता बचत गटांचा मोह या विषयाशी संबंधित संघ स्थापन करून मोहफूल उद्योग प्रक्रिया सुरू करता येईल. वन विभाग, महिला अर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाने एकत्रित येऊन मोहफुलांचे नेमके उत्पादन किती होते ? त्यासाठी काय उद्योग उभारता येईल ? व किती गट यासाठी तयार आहेत ? याची माहिती एकत्रित करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
फुलोराची केली प्रशंसा
दिभना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देवून व प्रात्यक्षिकाद्वारे विविध प्रकारचे शिक्षण देण्याचे घटक समजून घेतले. खेळत खेळत शिक्षण आत्मसात करताना त्यांनी तेथील विद्यार्थी व शिक्षकांशी गप्पा मारल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 'फुलोरा' प्रकल्प राज्यमंत्री यांना सांगितला. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी. निकम शिक्षणाधिकारी प्राथमिक अरुण धामणे, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.