वीरमाता व वीरपत्नींचा भावपूर्ण गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:38+5:30
लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सचिन खोब्रागडे यांनी यावेळी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकमत सखी मंच गडचिरोलीतर्फे स्थानिक आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात रविवारी सखी महोत्सव घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील वीर माता व वीर पत्नींचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, साडी व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, श्री किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सचिन खोब्रागडे, गडचिरोली ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर उद्दार, पुनम गोरे, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सैनिकी निदेशक सुभेदार नामदेव प्रधान, वीर माता कल्पना अमृतकर, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, डॉ. सुषमा जैन, सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सखी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, समाजामध्ये आनंद वाटप केला की, ते वाढत असते. दु:ख वाटले की ते कमी होत असते. शहीद कुटुंबियांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न लोकमत समुहाकडून सुरू आहे. शहीद कुटुंबीय तसेच महिलांसाठी लोकमतने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. वीर माता व भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शहीद पोलीस जवानांच्या पाल्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे, असे डॉ. उसेंडी यांनी यावेळी सांगितले.
लोकमत समुहामार्फत महिला व शहीद कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातून कुटुंबियांना धीर मिळत आहे. वीर माता व भगिनींच्या अंगी विविध गुण आहेत. त्यांचा व्यक्तीमत्व विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यासाठी लोकमतचा हा सखी महोत्सव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सचिन खोब्रागडे यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, संचालन प्रिया आखाडे, शिल्पा गुंडावार यांनी केले. तर आभार वडसाच्या संयोजिका कल्पना कापसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहसंयोजिका सोनिया बैस, रोहिणी मेश्राम, तृप्ती अलोणे, उज्वला साखरे, स्मिता खोब्रागडे, नैना मेश्राम आदींनी सहकार्य केले.
या वीर माता व पत्नींचा झाला सत्कार
याप्रसंगी सखी मंचतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वच्छला रामभाऊ नैताम, कमला हलामी व अनिता महादेव भोयर या तीन वीर मातांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, साडी व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच मोहिनी प्रमोद भोयर, कल्पना पुरणशहा दुग्गा, नलिनी लक्ष्मण कोडाप, सविता शाहूदास मडावी, लिना किशोर बोबाटे, विनाताई कालिदास हलामी, आशाताई प्रकाश पाटील, छबीना हेमराज टेंभुर्णे, हर्षा संतोष दुर्गे, स्मिता दामोधर नैताम, संगीता विलास मांदाळे या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मान
सखी मंचच्या चळवळीत उल्लेखनिय काम करणाऱ्या संयोजिका तसेच सखी सदस्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वडसाच्या तालुका संयोजिका कल्पना कापसे, आरमोरीच्या तालुका संयोजिका सुनिता तागवान, जिल्हा सहसंयोजिका सोनिया बैस, तृप्ती अलोणे, धानोराच्या संयाजिका ज्योती उंदिरवाडे, लगामच्या संयोजिका योगीता गेडाम, सोनाली पालारपवार, प्रेमा आर्इंचवार, नवेगावच्या संयोजिका नलिनी बोरकर, अंजली वैरागडवार, नैना मेश्राम, प्रिती मेश्राम, उज्वला साखरे, मंगला बारापात्रे, अर्चना भांडारकर, पूजा भारद्वाज, रोहिनी मेश्राम आदींचा समावेश आहे.