विभागीय पुरस्काराने मुत्तापूरचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:22 PM2017-11-20T22:22:52+5:302017-11-20T22:23:36+5:30
राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
अहेरी : राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानात अहेरी तालुक्यातील महागाव ग्राम पंचायत हद्दीतील मुत्तापूर गावाने प्रस्तावित ४८ कामे यशस्वीरित्या पूर्ण करून नागपूर विभागात अव्वल स्थान पटकाविले. त्याबद्दल जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साडेसात लाख रूपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
मुत्तापूर येथे सर्व यंत्रणांनी एकूण ४८ कामे प्रस्तावित केली होती. या कामांमध्ये शेततळे, बोडी नूतनीकरण, बंधारा दुरूस्ती, सिमेंट नाला बांधकाम आदींचा समावेश होता. गावाने प्रस्तावित कामे पूर्ण केली. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साडेसात लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी, सीईओ शांतनू गोयल, तालुका कृषी अधिकारी पानसरे, वाकडे, सरपंच हरी आत्राम, कृषी पर्यवेक्षक शंभरकर, कृषी सहायक लोनगाडगे हजर होते.
तसेच जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर द्वितीय पुरस्कार पटकाविल्याबद्दल सन्मानचिन्ह, तीन लाख रूपयांचा धनादेश तालुका कृषी अधिकारी पानसरे यांनी स्वीकारला. सदर अभियान उपविभागीय कृषी अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.
क्षेत्र व उत्पादनात वाढ
जलसंधारणाची कामे मुत्तापूर येथे झाल्याने शेतकऱ्यांचा कल भाजीपाला पिकाकडे वाढला. रबी पिकाखालील क्षेत्र १५ टक्के वाढले तसेच २५ टक्क्याने उत्पादनात वाढ झाली. गावकºयांनी लोकसहभागातून वृक्ष लागवड, वनराई बंधाºयाचे बांधकाम करून जलसंधारणाचे काम केले.