जाचक अटींविरोधात न्यायालयात जाणार
By admin | Published: May 26, 2016 02:25 AM2016-05-26T02:25:08+5:302016-05-26T02:25:08+5:30
अप्रशिक्षित शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी संदर्भात जाचक अटी रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल,
अप्रशिक्षित शिक्षकांच्या बैठकीत निर्णय : वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत
गडचिरोली : अप्रशिक्षित शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी संदर्भात जाचक अटी रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा निर्णय सोमवारी देसाईगंज येथील जवाहर भवनात पार पडलेल्या अप्रशिक्षित शिक्षक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे मार्गदर्शक अविनाश तालापल्लीवार होते. यावेळी राजू शेंडे, अशोक मांदाडे, अनिल सहारे, रेखा गडपल्लीवार, प्रवीणा म्हस्के, नरेंद्र निकोडे, तिरंगम, वड्डे उपस्थित होते.
बैठकीत अप्रशिक्षित शिक्षकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. सेवांतर्गत अध्यापक शिक्षण पदविका पूर्ण करणाऱ्या तसेच सेवांतर्गत बी. एड् झालेल्यांनाही पाठवावे. शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी कोणतीही अट नसावी, आदी समस्यांवर चर्चा करून शिक्षण मंत्र्यांना या संदर्भात निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
प्रत्येक पंचायत समितीने २००४ पासून स्थगित केलेल्या वेतनवाढ निकाली काढून त्यावरील थकबाकी तत्काळ काढावी. या संदर्भात जर संबंधित विभाग टाळाटाळ करीत असेल तर त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करावी, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सभेत कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रवी ठलाल, अविनाश तालापल्लीवार, सरचिटणीस गौतम लांडगे यांनी विविध बाबींवर मार्गदर्शन केले. तसेच अप्रशिक्षित शिक्षकांच्या अनेक समस्यांवर चर्चाही करण्यात आली.
प्रास्ताविक रवी ठलाल, संचालन प्रवीण सहारे तर आभार विलास दरडे यांनी मानले. अप्रशिक्षित शिक्षकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्याकरिता ३० मे रोजी पुन्हा बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. बैठकीला २०० अप्रशिक्षित शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)